
पिंपरी (Pimpri) : हिंजवडीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी माण-म्हाळुंगे या सहा किलोमीटर रस्त्याचे काम औद्योगिक विकास महामंडळाने काही वर्षापूर्वी हाती घेतले होते. मात्र, ‘पीएमआरडीए’कडून भूसंपादन रखडल्याने अनेक वर्षे उलटूनही या रस्त्याचे अर्धेच काम पूर्ण झाले आहे.
हिंजवडीमध्ये सुरू असलेले मेट्रोचे काम, त्यामुळे अरुंद झालेले रस्ते, पावसाळ्यात होणारी वाहतूक कोंडी या पार्श्वभूमीवर या पर्यायी रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी आयटी कर्मचारी करत आहे.
‘कनेक्टिव्हिटी’ वाढविणारा पर्यायी मार्ग
पुणे किंवा पिंपरी-चिंचवडमधून हिंजवडीत जाण्यासाठी भूमकर चौक किंवा भूजबळ चौक या दोनच मार्गांचा वापर केला जातो. परिणामी, या चौकांतून आयटी पार्कला जोडणाऱ्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होते. बहुतांश आयटी कर्मचारी हे बाणेर, बालेवाडी, वाकड, म्हाळुंगे या भागांत राहणारे आहेत.
या आयटीयन्ससाठी माण-सुस- म्हाळुंगे हा रस्ता हिंजवडीत जाण्यासाठी अधिक सोयीचा आहे. त्या अनुषंगाने ‘एमआयडीसी’ या सहा किलोमीटरच्या रस्त्याचे काम करत असून माणकडून येणाऱ्या तीन किलोमीटर रस्त्याचे काम पूर्णही झालेले आहे. मात्र, तेथून म्हाळुंगेच्या बाजूच्या या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे.
येथील खराब रस्त्यांवरून वाहन चालविणे कठीण होत असल्याने हा रस्ता वाहनचालकांसाठी गैरसोयीचा ठरत आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे पडत असल्याने आयटीयन्सला हिंजवडीत जाण्यासाठी भुजबळ चौकातच यावे लागत आहे.
पुलाचे उद्घाटन झाले, पण रस्ता कधी?
हिंजवडी ते बाणेर ही कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी माण - म्हाळुंगेदरम्यान मुळा नदीवर पूल बांधण्यात आला. या पुलाचे उद्घाटन २०१८- २०१९ या काळात झाले. यामुळे म्हाळुंगेतून हिंजवडीत जाणाऱ्या नागरिक व कर्मचाऱ्यांची मोठी सोय झाली. कनेक्टिव्हिटी वाढल्याने येथे मोठे गृहप्रकल्प उभे राहिले, शैक्षणिक संकुले सुरू झाली. मात्र, या दोन उपनगरांना जोडणारा रस्ताच खराब अवस्थेत असल्याने कर्मचारी हताश झाले आहेत.
या मार्गावरील तीन किलोमीटरच्या रस्त्याचे काम झाले आहे. उर्वरित काम भूसंपादन न झाल्याने रखडले आहे. असे ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
‘हिंजवडी-माणकडून म्हाळुंगेला जाणाऱ्या रस्ता चांगला करावा, याबाबत आम्ही गेली तीन वर्षे पाठपुरावा करत आहोत. काही भागापर्यंत हा रस्ता तीन पदरी झाला आहे. पण उर्वरित रस्ता अत्यंत खराब आहे. म्हाळुंगे परिसरात आरएमसी प्लॅंट आहेत. त्यामुळे जड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे येथून दुचाकी चालविणे कठीण झाले आहे. हा रस्ता चांगला झाल्यास बालेवाडीतून १० मिनिटांमध्ये हिंजवडीत पोहचू शकतो.’
- पवनजीत माने, अध्यक्ष, फोरम फॉर आयटी एम्प्लॉयीज
हिंजवडीसोबतच बाणेर, बालेवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. रस्त्यालगत अनेक मोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. बांधकाम सुरू असतानाच या रस्त्याचे कामही होणे गरजेचे होते. मात्र, ते झालेले नाही. हिंजवडी भागातून बालेवाडी स्टेडियममध्ये जाणारी मुले, दोन्ही बाजूंनी ये-जा करणारे कर्मचारी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.
- विजय पाटील, आयटी कर्मचारी व रहिवासी