Mumbai : 'त्या' प्रकल्पावर कट-कमिशनवाल्या गिधाडांच्या घिरट्या! मंत्री आशिष शेलारांच्या टार्गेटवर कोण?

Ashish Shelar
Ashish ShelarTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : देवनार डम्पिंग ग्राउंड साफ करण्यासाठी २,३६८ कोटींच्या खर्चाचे टेंडर मुंबई महापालिकेने (BMC Tender) काढले आणि कचऱ्यावर राजकारण करणारी काही गिधाडे, कावळे आणि बगळे लगेच आरोपांचे पंख पसरून या देवनार क्षेपणभूमीवर घिरट्या घालू लागले आहेत, असे टीकास्त्र मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी डागले आहे.

Ashish Shelar
'त्या' कंपनीची महाराष्ट्रात 5 हजार कोटींची गुंतवणूक; नागपूर, भिवंडी, चाकण, सिन्नर, पनवेलमध्ये...

हेच कावळे, गिधाडे आणि बगळे याच कचऱ्यावरचे कटकमिशन खाऊन गेल्या पंचवीस वर्षात गलेलठ्ठ झाले आहेत. युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन, आरोप करताना आज त्यांनी केलेली लूटमार सोईस्करपणे विसरत आहेत, असा टोलाही शेलार यांनी समाज माध्यमाद्वारे दिला आहे.

शेलार पुढे म्हणाले की, २००८ साली आदित्य ठाकरे यांची मुंबई महापालिकेत सत्ता असताना देवनार डम्पिंग ग्राउंड वरील कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी टेंडर काढण्यात आले त्याची किंमत ४,५०० कोटी होती. आतापर्यंत हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. आम्ही त्यावेळी या कंत्राटाला विरोध केला होता, या कंत्राटामध्ये अनेक उणीवा आहेत हे आम्ही दाखवले होते.

हा निधी वाया जाणार ही बाब आम्ही त्याचवेळी मुंबईकरांसमोर उघड केली होती. पण आमच्या विरोधाला न जुमानता तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी ४,५०० कोटी रुपयांचे देवनार डम्पिंग ग्राउंडचे टेंडर मंजूर केले. कटकमिशन खाल्ले आणि पुढे काहीच झाले नाही.

Ashish Shelar
Nashik : सिन्नरच्या मुसळगाव-माळेगाव एमआयडीसीना रिंगरोडने जोडणार

कचऱ्याचे ढिगारे देवनारमध्ये आजही कायम आहेत, दुर्गंधीने मुंबईकरांचा श्वास कोंडला आहे. दमा, फुफ्फुसाच्या आजारांनी मुंबईकर गेली ४० वर्षे हैराण झाले आहेत. देवनार डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करा अन्यथा एक वर्ष मुंबईतील नव्या बांधकामावर बंदी आणा असे सांगून न्यायालयाने झोडपून काढेपर्यंत सत्ताधारी म्हणून उबाठाने काहीच केले नाही. ४,५०० कोटीचे कंत्राट दिले त्याचा हिशेब कोण देणार? आता हेच महापालिका कचरा उचलण्याचे टेंडर काढले तरी ओरडणार, असे शेलार म्हणाले.

ज्यांनी ज्या कामासाठी ४,५०० कोटींचे टेंडर दिले, मलाई खाल्ली आणि पळ काढला तेच आता २,३६८ कोटी कशाला खर्च करताय? म्हणून ओरडत आहेत. मग त्यांनी देऊ केलेले ४,५०० कोटी मोठे की, आजचे २,३६८ कोटी? ज्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवनार येथील जागा दिली जाणार आहे, त्यातील एक इंच ही जागा अदानीच्या नावावर होणार नाही.

धारावी प्रकल्पाचा पुनर्विकास होताना मुंबई महापालिका, सरकार यांना महसूल मिळेल, अपात्र झोपडपट्टीवासीयांना ही घर मिळणार, मोकळी मैदाने, बगीचे, शाळा अशा सुविधा मुंबईकरांना मिळणार आहेत तरीसुद्धा या प्रकल्पाला आदित्य ठाकरे आणि उबाठाचा विरोध का? असा सवालही मंत्री शेलार यांनी उपस्थित केला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com