
पिंपरी (Pimpri) : मेट्रोच्या पीसीएमसी ते भक्ती-शक्ती चौक (पिंपरी ते निगडी) या विस्तारित मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गात खांब उभारणी आणि सेंगमेंटचे काम वेगाने सुरू आहे. नुकतेच आकुर्डी परिसरात फोर्स मोटर्स ते खंडोबा माळ चौकात सेंगमेंटचे काम झाले आहे.
पीसीएमसी स्थानकापासून चिंचवड, आकुर्डी, निगडी व भक्तीशक्ती चौक असे नवीन मेट्रो स्थानके उभी राहणार आहेत. या मार्ग विस्तारामुळे पुण्याच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि मध्य भागांशी मेट्रो मार्ग जोडला येणार आहे.
उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल आयटी आणि सांस्कृतिकनगरीच्या दिशेने झपाट्याने सुरू आहे. तसेच रोजीरोटी आणि शिक्षणासाठी शहरात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने शहराने तीस लाख लोकसंख्येचा टप्पा पार केला आहे.
या भागातील औद्योगिक क्षेत्र, लष्कराचा परिसर, शासकीय कार्यालय, वायसीएम रुग्णालय, महाविद्यालयांमुळे पिंपरी ते निगडी मार्गावर वाहनचालकांची सतत गर्दी असते. यामुळे कोंडीची समस्या उद्भवत आहे. तसेच प्रदूषणातही वाढ होत आहे. यावर मेट्रो प्रकल्पाचा विस्तार पिंपरी-चिंचवडकरांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
मार्गाचा विस्तार :
- निगडी ते पिंपरी या मेट्रो मार्गातील पहिल्या खांबांचे बांधकाम ६ जुलै २०२४ पासून सुरू झाले.
- पीसीएमसी ते भक्तीशक्ती मेट्रोचा विस्तार पुणे मेट्रोच्या लाइन-१ ए चा भाग आहे.
नवीन स्थानके :
या मेट्रो मार्गाला चिंचवड, आकुर्डी, निगडी आणि भक्ती-शक्ती चौक येथे नवीन स्थानके जोडली जातील.
१. चिंचवड : या परिसराजवळ औद्योगिक परिसर असून काही अंतरावर ऐतिहासिक ठिकाणे आहेत. दाट लोकवस्ती आणि चिंचवड रेल्वे स्थानक असल्याने प्रवासी आणि स्थानिकांना याला लाभ होइल.
२. आकुर्डी : आकुर्डी येथील अभियांत्रिकी, व्यवस्थापनाची महाविद्यालये आहेत. यासोबतच केंद्रीय सदन असल्याने अनेक सरकारी कार्यालये आहेत. त्यामुळे हे मेट्रो स्थानक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना प्रवासासाठी सोईचे ठरेल.
३. निगडी : निगडी-प्राधिकरण स्थानक परिसरात शासकीय कार्यालये, नाट्यगृहे असल्याने सांस्कृतिक घडामोडी सुरू असतात. त्यामुळे या स्थानकामुळे मनोरंजनाची ठिकाणे जोडली जातील. यामुळे नागरिकांचा प्रवास सुलभ होईल.
४. भक्ती-शक्ती : या परिसरातील धार्मिक स्थळ हे मेट्रो मार्गाशी जोडली जातील. यामुळे देहू, चिखली, तळेगाव आणि वडगांवसारख्या क्षेत्रांना हा मार्ग जोडला जाणार. तसेच पीएमपीएमएल बस डेपोशी प्रवासी जोडले जातील.
पीसीएमसी ते निगडी मेट्रो मार्गाचे काम जलद सुरू आहे. लवकरच चिंचवड, आकुर्डी, निगडी आणि भक्ती-शक्ती चौक ही स्थानके उभारल्यानंतर शहरवासीयांना फायदेशीर ठरेल.
- डॉ. हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो
पुणे शहरात जाण्यासाठी पीएमपीने धक्के खात जावे लागते. रेल्वेने जायचे म्हटले, तर लोकल रद्द होण्याच्या तक्रारी असतात. परिणामी, खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत होता. मेट्रो सुरू झाल्यानंतर पिंपरीला वाहन पार्क करावे लागत होते. पण, निगडीपर्यंत मेट्रो स्थानक झाल्यावर पुण्यापर्यंतचा प्रवास सुखकारक होणार आहे.
- संजय चव्हाण, तळवडे