
पुणे (Pune) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) चौकातील (आनंदऋषी चौक) दुहेरी उड्डाणपुलाच्या एका बाजूचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. किरकोळ काम पूर्ण करून उड्डाणपुलाची एक बाजू ३१ मे अखेरीस सुरू करण्याचे नियोजन असल्याचे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए PMRDA) सांगितले.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे काम ‘पीएमआरडीए’ने हाती घेतले आहे. या प्रकल्पासाठी विद्यापीठासमोरील पूल २०२० मध्ये पाडण्यात आला. त्या ठिकाणी दुमजली उड्डाणपूल करण्यात येणार आहे.
हे काम जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना ‘पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणा’च्या (पुमटा) बैठकीत देण्यात आल्या होत्या. मात्र, चौकातील सेवा वाहिन्यांचे स्थलांतर करण्याचे काम महापालिकेकडून वेळेत पूर्ण झाले नाही; तसेच वाहतूक पोलिसांनी गणेशखिंड रस्त्यावर काम करण्यास ‘पीएमआरडीए’ला परवानगी देण्यास उशीर केला होता. त्यामुळे पुलाच्या कामास विलंब झाला.
गणेशखिंड रस्त्यावरील ई-स्केअर येथून हा पूल सुरू होऊन बाणेर येथे उतरणार आहे. त्या उड्डाणपुलाचे काम २०२३ मध्ये सुरू झाल्यानंतर त्याला जानेवारी २०२४, त्यानंतर ऑगस्ट आणि नोव्हेंबरची मुदत दिली होती. आता पुन्हा ३१ मे ही तारीख दिली आहे. दरम्यान पुलाचे काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे. उड्डाणपुलाची एक बाजू महिनाभरानंतर सुरू झाल्यास वाहन चालकांची वाहतूक कोंडीतून काही प्रमाणात सुटका होण्याची शक्यता आहे.
उड्डाणपुलाच्या एका बाजूचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. काही किरकोळ काम बाकी आहेत. तसेच चौकातील प्रवेशद्वारासमोरील कामही लवकरच पूर्ण होईल. त्यामुळे मे अखेरीस उड्डाणपुलाची एक बाजू खुली करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए