दिघीत १५ हजार कोटींचा शिपबिल्डिंग प्रकल्प; ९० हजार रोजगारनिर्मितीचे लक्ष्य

एनशिपएमएल आणि माझगाव डॉकमध्ये सामंजस्य करार; प्रतिवर्ष किमान १.२ दशलक्ष ग्रॉस टनेज जहाजबांधणी क्षमतेचे उद्दिष्ट
माझगाव डॉक
Mazagon Dock ShipbuildersTendernama
Published on

मुंबई (Mumbai): रायगड जिल्ह्यातील दिघी येथे प्रस्तावित ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहात प्रमुख जहाजबांधणी केंद्र म्हणून सहभागी होण्यासाठी नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड (एनशिपएमएल) आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे राज्यात ९० हजार रोजगारनिर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

माझगाव डॉक
विदर्भात ग्रीन स्टीलसह मायनिंग हबच्या दिशेने वाटचाल; ५ लाख कोटींची गुंतवणूक

या वेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, बंदरे व परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, बिझनेस डेव्हलपमेंटचे सरव्यवस्थापक संजयकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा आणि प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते. एमडीएलतर्फे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन जगमोहन, तर एनशिपएमएलतर्फे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप पी. यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

ग्रीनफिल्ड जहाजबांधणी समूहाची उभारणी

महाराष्ट्रात ग्रीनफिल्ड जहाजबांधणी समूह विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मुंबई बंदर प्राधिकरण यांनी संयुक्तपणे नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड (एनशिपएमएल) या विशेष उद्देश कंपनीची स्थापना केली आहे.

केंद्र शासनाच्या ग्रीनफिल्ड जहाजबांधणी समूह विकास आराखड्यांतर्गत हा प्रकल्प पुढे नेण्यात येत असून, ‘मेरीटाईम अमृत काल व्हिजन २०४७’च्या उद्दिष्टांना तो पूरक ठरणार आहे.

१५ हजार कोटींची प्रस्तावित गुंतवणूक

सामंजस्य करारानुसार एमडीएलने दिघी येथे प्रतिवर्ष किमान १.२ दशलक्ष ग्रॉस टनेज जहाजबांधणी क्षमतेचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यासाठी सुमारे १५ हजार कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक अपेक्षित आहे.

या प्रकल्पामुळे मोठ्या व्यावसायिक जहाजांची निर्मिती करणे शक्य होणार असून, देशाच्या सागरी औद्योगिक क्षमतेला बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे. आधुनिक जहाजबांधणी पायाभूत सुविधा उभारण्याबरोबरच त्यांना पूरक औद्योगिक आणि पुरवठा साखळी परिसंस्थाही विकसित होणार आहे.

माझगाव डॉक
जांबुटके एमआयडीसीचा ‘श्रीगणेशा’; ५९.७३ कोटींत पायाभूत सुविधा उभारणार

रोजगार आणि पुरवठा साखळीला चालना

दिघी येथील प्रकल्पामुळे देशांतर्गत जहाजबांधणी क्षमता वाढविणे, तंत्रज्ञान आणि गुंतवणूक आकर्षित करणे, कुशल रोजगारनिर्मिती तसेच जागतिक सागरी क्षेत्रातील भारताची स्पर्धात्मकता वाढविण्यास चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

प्रकल्पामुळे जहाजबांधणीशी संबंधित विविध उद्योग, पुरवठादार आणि सेवा क्षेत्रांना चालना मिळून सागरी औद्योगिक परिसंस्थेच्या विस्ताराला मदत होऊ शकते.

जागतिक स्तरावरील सुविधेचे उद्दिष्ट

एमडीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन जगमोहन यांनी या उपक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

जटिल जहाजबांधणी, अभियांत्रिकी, प्रकल्प व्यवस्थापन आणि सक्षम देशांतर्गत पुरवठादार व्यवस्था विकसित करण्याचा अनुभव एमडीएलकडे आहे. सर्व संबंधित घटकांच्या सहकार्याने दिघी येथे आधुनिक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक जहाजबांधणी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

माझगाव डॉक
नाशिकमधील मका उत्पादकांसाठी गुड न्यूज! येवल्यात ७६० कोटींचा प्रक्रिया उद्योग

Key Points

  • रायगडच्या दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह विकसित करण्यासाठी एनशिपएमएल आणि माझगाव डॉकमध्ये सामंजस्य करार,

  • दिघी प्रकल्पासाठी माझगाव डॉकची सुमारे १५ हजार कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक,

  • प्रतिवर्ष किमान १.२ दशलक्ष ग्रॉस टनेज जहाजबांधणी क्षमतेचे उद्दिष्ट,

  • प्रकल्पामुळे राज्यात ९० हजार रोजगारनिर्मितीचे लक्ष्य,

  • महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मुंबई बंदर प्राधिकरणाच्या संयुक्त पुढाकारातून एनशिपएमएलची स्थापना,

  • आधुनिक जहाजबांधणी पायाभूत सुविधा आणि पूरक औद्योगिक व पुरवठा साखळी परिसंस्था विकसित करण्याचे नियोजन,

  • ‘मेरीटाईम अमृत काल व्हिजन २०४७’च्या उद्दिष्टांना प्रकल्प पूरक ठरणार.

Tendernama
www.tendernama.com