Sinhast Mahakumbh Tendernama
टेंडर न्यूज

Nashik: सिंहस्थात 'या' 3 ठिकाणी उभारणार ध्वजस्तंभ

सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रसिद्ध केले टेंडर

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थ, नवीन गोदावरी घाट व नाशिकला रामकुंड येथे तीन ध्वजस्तंभ उभारण्यात येणार आहे.

या ध्वजस्तंभ उभारणीसाठी वापरण्यात येणारे साहित्य हे सरकारी दरसूचीमध्ये येत नाही. यामुळे या ध्वजस्तंभासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचे दर निश्चित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने टेंडर प्रसिद्ध केले आहे. यात ध्वज तयार करणे, तो उभारणे याचा अंतर्भाव आहे.

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये सिंहस्थध्वज उभारण्याला फार महत्व असते. हा ध्वज प्रामुख्याने कुंभस्नानाच्या मुख्य जागेवर उभारला जातो. यामुळे प्रत्येक सिंहस्थात नाशिक येथे रामकुंडावर व त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थावर हा सिंहस्थ ध्वज उभारला जातो.

सूर्याने सिंह राशीत प्रवेश करण्याच्या खगोलीय घटनेच्या निमित्ताने हा ध्वज उभारला जातो. सूर्याचा सिंह राशीत यावर्षी ऑक्टोबरमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे हा ध्वज यावर्षी उभारला जाण्याची शक्यता आहे.

यामुळे हा ध्वज उभारण्यासाठी त्याचे टेंडर प्रसिद्ध करण्यापूर्वी त्याचे दर निश्चित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने हे टेंडर प्रसिद्ध केले आहे. हे धर्मध्वज प्रामुख्याने ५१ फूट व ३१ फूट उंचीचे असणार आहेत. हे ध्वजसाठी पितळ, तांबे, कांस्य, स्टेनलेस स्टील हे धातू वापरण्यात येणार आहे. तसेच स्तंभ हे मोल्डींग पद्धतीने बनवायचे आहेत.

याशिवाय या ध्वजावर समुद्र मंथनातून बाहेर आलेल्या रत्नाच्या प्रतिकृती स्थापित करायच्या आहेत. या बाबतचे दर राज्य दरसूचीमध्ये नसल्याने आधी त्या ध्वजासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचे दर निश्चित करून त्यानंतर ध्वज उभारणीचे टेंडर प्रसिद्ध केले जाईल.

प्रथमच तीन ध्वज

सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक व त्र्यंबकेश्वर या दोन ठिकाणी होत असतो. यामुळे आतापर्यंत या दोन्ही ठिकाणी कुशावर्त तीर्थ व रामकुंड येथे सिंहस्थ ध्वज उभारला जात असे. यावेळी त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थाप्रमाणेच गोदावरीच्या नवीन घाटांवरही ध्वज उभारला जाणार आहे.

कुशावर्त तीर्थ येथे जागा अगदीच कमी असून तेथे मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना स्नान करण्याची सुविधा उभारणे अशक्य आहे. यामुळे त्र्यंबकेश्वरबाहेर गोदावरीवर घाट उभारले जात आहेत. याठिकाणी पाणी वाहते राहावे यासाठी खालच्या धरणातून जलवाहिनीने पाणी आणून वरच्या भागात टाकले जाणार आहे. यामुळे वाहत्या पाण्यात भाविक सिंहस्थ स्नान करू शकतील, असा त्यामागील हेतू आहे.

याठिकाणी भाविकांनी स्नान करावे, यासाठी त्या घाटांवर तिसरा सिंहस्थ ध्वज उभारला जाणार आहे. हा ध्वज उभारल्यानंतर संबंधित संस्थेला त्याची दहा वर्षे देखभाल दुरुस्ती करावी लागणार आहे. त्यात प्रत्येक तीन वर्षांनी संबंधितांस ३३ टक्के देयक दिले जाणार आहे.