Nitin Gadkari Tendernama
टेंडर न्यूज

नागपूरमधील इंदोरा-दिघोरी उड्डाणपूल खुला; तासाभराचा प्रवास आता अवघ्या १० मिनिटांत

८.९ किमी लांबीच्या उड्डाणपुलासाठी यूएचपीएफआरसी तंत्रज्ञानाचा वापर; सुमारे १ हजार कोटींचा प्रकल्प नागपूरच्या उत्तर-दक्षिण कनेक्टिव्हिटीला मिळणार वेग

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Nagpur): नागपूर शहराच्या उत्तर आणि दक्षिण भागाला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३डीवरील दिघोरी चौक ते इंदोरा चौक या सुमारे ८.९ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या उड्डाणपुलामुळे इंदोरा ते दिघोरी हा प्रवास पूर्वीच्या सुमारे एका तासावरून आता १० ते १५ मिनिटांवर येणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

उड्डाणपुलाच्या बांधकामात अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिनफोर्स्ड काँक्रीट (UHPFRC) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे दोन खांबांमधील मोठे अंतर एका पेअरच्या माध्यमातून व्यापणे शक्य झाले. त्यामुळे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आल्याचे गडकरी यांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुमारे १ हजार कोटी रुपये खर्चून हा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे.

उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी मलेशियातील पिअर टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आल्याचेही गडकरी यांनी सांगितले. अशोक चौक येथे हा उड्डाणपूल पाच दिशांना जोडला जातो. येथे अशोक स्तंभ उभारण्यात आला असून, संविधानावर आधारित भित्तिचित्रे आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उड्डाणपुलामुळे शहरातील कोणत्याही रस्त्याच्या नावात बदल करण्यात आलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

उड्डाणपुलाला डागा रुग्णालय, रेशीमबाग चौक आणि मोठा ताजबाग येथे रॅम्प देण्यात आले आहेत. त्यामुळे गांधीबाग आणि पाचपावली परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. अग्रसेन चौक येथे मेट्रोच्या वरून जाणारा मार्ग देण्यात आला आहे. वर्धा रोड आणि कामठी रोडप्रमाणे येथेही बहुपदरी वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

उड्डाणपुलाला डॉ. हेडगेवारांचे नाव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त या उड्डाणपुलाला आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. उड्डाणपुलाच्या लोकार्पणानंतर कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या जाहीर कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली.

नागपूर शहरात सुरू असलेल्या विविध पर्यावरणपूरक प्रकल्पांमुळे भविष्यात शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून विकसित होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर शहराभोवती १४८ किलोमीटर लांबीचा गोल्डन आर्च रिंग रोड विकसित होत असून, त्यामुळे शहराच्या विस्ताराला मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर शहरात सध्या ३५ उड्डाणपूल असून आणखी १५ उड्डाणपूल प्रस्तावित असल्याची माहितीही त्यांनी दिली.

‘नवीन नागपूर’मध्ये गुंतवणुकीला चालना

नागपूरमध्ये ‘नवीन नागपूर’ विकसित होत असून, सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टच्या माध्यमातून गुंतवणुकीचे केंद्र उभारले जात आहे. नवीन नागपूरसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून, या भागात युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

या उड्डाणपुलामुळे केवळ उत्तर आणि दक्षिण नागपूरलाच फायदा होणार नसून नागपूर ग्रामीणमधील हुडकेश्वर, नरसाळा, बेसा आणि पिपळा या भागांनाही चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

लोकार्पण कार्यक्रमादरम्यान गडकरी आणि फडणवीस यांनी अशोक चौक येथील अशोक स्तंभ तसेच विद्युत रोषणाईची पाहणी केली. सुरेश भट सभागृहातील कार्यक्रमात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि प्रकल्पाचे कंत्राटदार नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अधिकाऱ्यांचा गडकरी आणि फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Key Points

  • दिघोरी चौक ते इंदोरा चौक ८.९ किमी उड्डाणपुलाचे लोकार्पण,

  • UHPFRC तंत्रज्ञानामुळे दोन खांबांमधील मोठे अंतर व्यापणे शक्य,

  • इंदोरा-दिघोरी प्रवासाचा वेळ एका तासावरून १० ते १५ मिनिटांवर येणार,

  • सुमारे १ हजार कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत प्रकल्पाची उभारणी,

  • उड्डाणपुलाला डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव देण्याची घोषणा