Fourth Mumbai Tendernama
टेंडर न्यूज

Mumbai : मुंबई, नवी मुंबई, तिसरी मुंबई... आता येणार चौथी मुंबई! कसा आहे प्लॅन?

Wadhvan Port : वाढवण बंदराला लागूनच मुंबईतील तिसरे विमानतळ उभारण्यात येईल.

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : सध्या पनवेलमधील (Panvel) आंतरराष्ट्रीय विमानतळ (Navi Mumbai International Airport), अटल सेतू (Atal Setu), 'जेएनपीटी' (JNPT), नैना क्षेत्रातील विविध विकासप्रकल्पांमुळे रायगड (Raigad) जिल्ह्यात 'तिसरी मुंबई' (Third Mumbai) उभी राहत आहे. त्यासोबतच आता पालघर जिल्ह्यात 'चौथी मुंबई' (Fourth Mumbai) आकाराला येत आहे.

पालघरमध्ये जगातील दहाव्या क्रमांकाचे सर्वात मोठे वाढवण बंदर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे नवे विमानतळ, मुंबईतून थेट पालघरला जोडणारा सागरी मार्ग, बुलेट ट्रेन असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित आहेत.

पालघरमध्ये उभारण्यात येणारे वाढवण बंदर हे केवळ जिल्ह्याचेच नव्हे, तर महाराष्ट्राचे विकासचित्र पालटणारे ठरणार आहे. या बंदरामुळे पालघरची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. वाढवण बंदराची प्रस्तावित जागा ही नैसर्गिकरित्याच २० मीटर खोल आहे. इतके खोल असणारे हे भारतातील एकमेव बंदर असेल. या खोलीमुळे जगातील सर्वांत मोठी कंटेनर जहाजे भारतात दाखल होतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० ऑगस्ट रोजी वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न झाले. तसेच या बंदराचे काम पूर्ण होईपर्यंत पालघरमध्ये नवे विमानतळ आणि रस्ते प्रकल्पांची उभारणीही करण्यात येणार आहे.

वाढवण बंदरामुळे दरवर्षी २९८ दशलक्ष मॅट्रिक टन मालाची हाताळणी करणे शक्य होणार आहे. त्यात सुमारे २३.२ दशलक्ष टीईयू कंटेनर हाताळणी क्षमतेचा समावेश असेल. आज देशातील एकूण कंटेनर ट्रॅफिकपैकी ७० टक्के कंटेनर ट्रॅफिक एकटे 'जेएनपीए' बंदर हाताळते. या 'जेएनपीटी' बंदराच्या तीनपट मोठे वाढवण बंदर असेल.

वाढवण बंदर प्रकल्प हा महाराष्ट्र सरकार आणि 'जेएनपीटी' यांचा संयुक्त उपक्रम आहे. एका कंपनीच्या माध्यमातून या प्रकल्पाची अंमलबजावणी होईल. वाढवण बंदर उभारल्यास येथील लाखो नागरिकांना रोजगार मिळणार असून देशाच्या विकासाला नवी चालना मिळेल.

वाढवण बंदराला लागूनच मुंबईतील तिसरे विमानतळ उभारण्यात येईल. पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक क्षेत्र असल्याने प्रकल्पांसाठीच्या जागांवर मर्यादा आहेत. मात्र, वाढवण बंदराला लागूनच 'रिक्लेमशन' करून हे नवे विमानतळ उभारण्यात येणार आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ही मागणी मान्य केली आहे. यामुळे वसई-विरारपासून पुढे पालघरकडे 'चौथी मुंबई' म्हणजे आणखीन एक महानगर वसविले जाईल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

वर्सोवा-विरार-पालघर सी-लिंक

चौथ्या मुंबईच्या निर्माणात वाढवण बंदर हा प्रकल्प जितका महत्त्वाचा,तितकाच वर्सोवा-विरार-पालघर सी-लिंक हा प्रकल्पही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पामुळे नरिमन पॉईंट ते पालघर हा प्रवास केवळ एक तासांत करणे शक्य होईल. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मुंबई ते विरार असा ४३ किमी लांबीचा वर्सोवा-विरार सी-लिंक बांधण्याचे नियोजन आहे.

या प्रकल्पाला पश्चिम उपनगरात जाणारे सहा पदरी जोडरस्ते असतील. हाच मार्ग पुढे उत्तन आणि पालघरपर्यंत विस्तारण्यात येणार आहे. वर्सोवा-विरार-पालघर हा सागरी सेतू पालघरला थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. रस्तामार्गे विरार ते पालघर ५४.६ किमी अंतर आहे.

मुंबई मेट्रो-१३

वसई शहरवासीयांसाठी मेट्रोमार्ग-१३ची घोषणा करण्यात आली होती. याअंतर्गत मिरा-भाईंदर ते वसई-विरार हा मेट्रो मार्ग जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी दि. ९ जुलै २०२४ रोजी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. वसई-विरारची एकूण लोकसंख्या आणि मिरा-भाईंदर, वसईचे शहरीकरण लक्षात घेऊन हा मेट्रो मार्ग हाती घेण्यात आला आहे.

मीरा रोड ते विरार हा २३ किमीचा मेट्रो मार्ग असून, त्यात २० स्थानकांचा समावेश आहे. वसई-विरार शहरासाठी मेट्रोला मान्यता मिळाली असली, तरी मध्ये खाडी असल्याने मेट्रो मार्गाच्या उभारणीत अडचणी होत्या. मात्र, वसईच्या खाडीवर महाराष्ट्रातील दुसरा डबल डेकर पूल उभारण्यात येणार आहे. या पुलावर खाली वाहनांसाठी रस्ता असणार आहे, तर एकाच खांबावर वर मेट्रो रेल्वेचे ट्रॅक आणि खाली वाहनांसाठी पूल अशी रचना असेल.

मुंबई-अहमदाबाद हायवे हा वसई आणि भाईंदरला जोडणारा एकमेव पर्याय आहे. या प्रवासात बराच वेळ जातो. मात्र, या मेट्रो मार्गामुळे वसई आणि भाईंदरला रस्ते आणि मेट्रोने प्रवास करता येणार आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन

महाराष्ट्रात बुलेट ट्रेनचे एकूण चार थांबे आहेत. त्यात बीकेसी, ठाणे, विरार आणि बोईसर या स्थानकांचा समावेश आहे. या बुलेट ट्रेन स्थानक परिसरात विविध विकासकामांचे नियोजन असेल. तसेच नागरी वसाहती आणि व्यवसाय केंद्र विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये स्थानकापासून ५०० मीटर परिसरात, एक किमी परिसरात आणि दोन किमी परिसरात प्रकल्पामुळे नागरीकरण वाढण्याची शक्यता असून, त्या अनुषंगाने नागरी सुविधांबाबतची विकासकामे केली जातील.

यात रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, इमारती, रुग्णालये आणि इतर कामांचा समावेश असेल. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग पालघर जिल्ह्यातील ७३ गावांतून जात आहे. यात वसई-विरारमधील २१ गावांचा समावेश आहे.