Devendra Fadnavis, Vidarbha Tendernama
विदर्भ

Devendra Fadnavis : फडणवीसांचे विदर्भाला मोठे गिफ्ट! 'त्या' मोठ्या प्रकल्पासाठी तब्बल 26 हजार कोटींची...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या कामासाठी २५ हजार ९७२ कोटी ६९ लाख रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चौथी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) होते.

या प्रकल्पामुळे नागपूर, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील १ लाख ९६,६०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. गोसीखूर्द राष्ट्रीय प्रकल्प हा विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांच्याद्वारे राबविण्यात येत आहे.

गोदावरी खोऱ्यातील वैनगंगा उपखोऱ्यात वैनगंगा नदीवर गौसीखुर्द (ता.पवनी) येथे हा बहुउद्देशीय प्रकल्प साकारण्यात येत आहे. सिंचन, पिण्यासाठी पाणी, औद्योगिक पाणी पुरवठा व मत्स्यव्यवसाय व जलविद्युत निर्मिती असा हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे.

या प्रकल्पातून खुले कालवा वितरण, उपसा सिंचन व बंदिस्त नलिका वितरण या पद्धतीने नागपूर, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांतील सिंचन क्षेत्राला लाभ होणार आहे. हा प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट आहे.

पूर्व विदर्भातील हा मोठा व महत्त्वाचा राष्ट्रीय प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यादृष्टीने या प्रकल्पाच्या खर्चास चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.