NMC, Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

बापरे! नाशिक महापालिकेने खड्डे बुजवण्यावर उडवले 225 कोटी

Nashik: चालू आर्थिक वर्षातही ३० कोटी रुपये खड्डे बुजवण्यावर खर्च करण्याचे नियोजन

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्डे हा गेले काही वर्षे कळीचा मुद्दा झालेला आहे. उन्हाळ्यात वेगवेगळ्या कामांसाठी रस्त्यावर खोदकाम सुरू असते. त्याची वेळेवर डागडुजी न केल्याने पावसाळ्यात ते खड्डे आणखी वाढतात. मग महापालिका भर पावसाळ्यात खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करते. पुन्हा पावसात ते डांबरी पॅच धूवून जातात आणि रस्त्यावरील खड्डे तसेच राहतात किंवा रस्त्यांवर ठिकठिकाणी डांबरी पॅचचे टेंगूळ दिसत असतात.

या सर्व बाबींसाठी महापालिकेने गेल्या चार आर्थिक वर्षांमध्ये जवळपास २२५ कोटी रुपये खर्च केले असून या आर्थिक वर्षातही ३० कोटी रुपये खड्डे बुजवण्यावर खर्च करण्याचे नियोजन आहे. यामुळे महापालिका दरवर्षी खड्डे बुजवण्यावर कोट्यवधी रुपये खर्च करीत असली तरी नाशिककरांच्या नशिबातील खड्डे कायम असल्याचे चित्र आहे.

नाशिक महापालिकेचे जवळपास २४०० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. ज्यात डांबरी रस्ते १६५० किलोमीटर लांबीचे आहेत. काँक्रिट रस्ते ४०० किलोमीटर लांबीचे, तर उर्वरित रस्ते खडीकरण झालेले आहेत. या डांबरी रस्त्यांपैकी ४० टक्के रस्त्यांचे गेल्या दहा वर्षांत नुतनीकरण केलेले नाही. यावरून नाशिक शहरातील बहुतांश रस्ते हे नादुरुस्त आहेत. त्यात भूमिगत गटारी, महानगर गॅस लिमिटेड आदी कामांसाठी गेले काही वर्षे नाशिकचे रस्ते खोदले जात आहे. यामुळे आधीच नादुरुस्त असलेल्या रस्त्यांवर दर पावसाळ्यात खड्डे पडत असतात.

हे खड्डे बुजवण्यासाठी महापालिका दरवर्षी खर्च करीत असते. नाशिक महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या आकडेवारीनुसार २०२२- २०२३ मध्ये १०५ कोटी रुपये, २०२३- २०२४ मध्ये ५७ कोटी रुपये, तर २०२४-२५ मध्ये सुमारे ३० कोटी रुपये खड्डे बुजवणे आणि तात्पुरत्या रस्ते दुरुस्तीवर खर्च करण्यात आले.

यावर्षीही महापालिकेने खड्डे बुजवण्यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. चार वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च झाले, पण रस्त्यांची दुरवस्था कायम राहिली आहे. प्रत्येक पावसाळयापूर्वी खड्डे करायचे, ते बुजवायचे आणि पावसामुळे पडलेले खड्डे पुन्हा पावसात बुजवायचे हे महापालिकेचे खड्ड्याच पैसे जिरवण्याचे तंत्र बनले आहे.

यामुळे नाशिकच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. या खड्ड्यांमुळे वाहने खिळखिळी होत आहेच, शिवाय नागरिकांनाही मणके विकार जडल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

नागरिकांच्या खड्ड्यांबाबत तक्रारी वाढल्यानंतर महापालिका ठेकेदारांविरोधात कारवाई करण्याचा देखावा करते. त्यांना नोटीसा पाठवते. त्यानंतर लोकांचा रोष शांत झाला म्हणजे कारवाईचा जोश कमजोर पडतो व पुन्हा पुढच्या पावसाळ्यापर्यंत लोकही विसरून जातात. महापालिकेने यंदाही खड्डे बुजवण्यासाठी तीस कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.

महापालिका निवडणूक असल्याने शहरातील आमदार तसेच कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनाला रस्ते दुरुस्तीविषयी सक्त ताकीद दिल्यानंतर पावसाळा उघडल्यानंतर रस्ते दुरुस्ती करण्यात आली. मात्र, त्या दुरुस्तीचा दर्जा सुमार असल्यामुळे त्या रस्त्यांवरील डांबर उडून पुन्हा खडी उघडी पडली आहे. एकीकडे सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे प्रमुख रस्त्यांची कामे सुरू असताना इतर मार्गांची दुरवस्था कधी संपणार हा प्रश्न कायम आहे.