Nashik, Trimbakeshwar Darshanpath Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Trimbakeshwar Darshan Path: सिंहस्थापूर्वी त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलणार

कुशावर्त तीर्थ ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील घरांना एकसमान स्वरूप; डागडुजी आणि रंगरंगोटीचा खर्च शासनाच्या निधीतून

टेंडरनामा ब्युरो

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar): सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात येणाऱ्या त्र्यंबकेश्वर दर्शनपथामुळे कुशावर्त तीर्थ ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे. या मार्गावरील घरांच्या दर्शनी भागाची डागडुजी, रंगरंगोटी आणि एकसमान स्वरूपात सुशोभीकरण करून त्र्यंबकेश्वरची ऐतिहासिक व धार्मिक ओळख जपली जाणार आहे. दर्शनपथ-दोनच्या निधीतून हे काम करण्यात येणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर येथे दर्शनपथ उभारण्यात येत आहे. यानिमित्ताने त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी येणा-या भाविकांना चांगल्या सुविधा देण्याबरोबरच येथील धार्मिक, अध्यात्मिक महत्व लक्षात घेऊन परिसराचे सुशोभीकरण केले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थ ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या भागातील चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे.

त्यासाठी या भागातील घरांच्या दर्शनी भागाची डागडुजी, रंगरंगोटी आणि एकसमान स्वरुपातील सुशोभीकरण करून शहराचा ऐतिहासिक व धार्मिक चेहरा जपला जाणार आहे. दर्शनपथ दोनच्या निधीतून हे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यासाठी नुकतीच या भागातील रहिवाशांची बैठक घेऊन त्यांना याबाबत माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्ताने तीर्थक्षेत्र विकास निधी व कुंभमेळा प्राधिकरण यांनी दर्शनपथ उभारणे व इतर पायाभूत सुविधांसाठी जवळपास ५५० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यातील दर्शनपथाच्या कामास सुरुवात झाली आहे. दर्शनपथ टप्पा एक व दोन स्वरुपाचा असून त्यातून भाविकांना दर्शनासाठी सुविधा उभारल्या जाणार आहेत. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिर परिसराचे सुशोभीकरण केले जाणार आहे. याच दर्शनपथाचा भाग म्हणून कुशावर्ततीर्थ ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावरील सर्व घरांच्या दर्शनीभागाचे सुशोभीकरण केले जाणार असल्याने या भागातील रहिवाशांची नगरपालिका कार्यालयात बैठक घेण्यात आली.

यावेळी नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, उपनगराध्यक्षा दीपाली पाटणकर, नगरसेवक, मुख्याधिकारी जाधव यांच्यासह वास्तुविशारद हेमंत पाटील आदी उपस्थित होते. नाशिकमधील रामपथच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वरचा ‘शाही मार्ग’ अर्थात दर्शनपथ-दोन विकसित करण्याचा आराखडा यावेळी रहिवाशांसमोर सादर करण्यात आला.

घरमालकांच्या संमतीने घरांच्या दर्शनी भागाला एकसमान स्वरूप देण्यात येणार असून, डागडुजी व रंगरंगोटीचा खर्च शासनाच्या निधीतून केला जाणार आहे. त्यामुळे या परिसराचा चेहरामोहरा बदलण्याबरोबरच त्र्यंबकेश्वरच्या प्राचीन तीर्थक्षेत्राची ओळख आणि वारसा जपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

तोडफोड करणार नाही

सुशोभीकरण करताना घरांची तोडफोड केली जाणार नाही. तसेच घराच्या जागेचे क्षेत्रफळ कमी-जास्त करणे किंवा बांधकामाच्या मूळ स्वरूपात बदल करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. केवळ दर्शनी भागाची आवश्यक डागडुजी, रंगरंगोटी आणि सुशोभीकरण करून मार्गाला एकसंध रूप देण्यात येणार आहे. बैठकीला घरमालकांची मोठी उपस्थिती होती. 

Key Points

  • कुशावर्त तीर्थ ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गाचे सुशोभीकरण होणार.

  • मार्गावरील घरांच्या दर्शनी भागाची डागडुजी आणि रंगरंगोटी केली जाणार.

  • घरमालकांच्या संमतीने दर्शनी भागाला एकसमान स्वरूप दिले जाणार.

  • कामाचा खर्च शासनाच्या निधीतून केला जाणार.

  • दर्शनपथ-दोनच्या निधीतून सुशोभीकरणाचे काम होणार.

  • त्र्यंबकेश्वर दर्शनपथ आणि अन्य सुविधांसाठी जवळपास ५५० कोटींचा निधी मंजूर.

  • रहिवाशांसमोर प्रस्तावित कामांचा आराखडा सादर करण्यात आला.

  • सुशोभीकरणासाठी घरांची तोडफोड केली जाणार नाही.

  • घरांचे क्षेत्रफळ किंवा बांधकामाच्या मूळ स्वरूपात बदल केला जाणार नाही.

  • मार्गाला एकसंध स्वरूप देतानाच त्र्यंबकेश्वरचा धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा जपला जाणार.