नाशिक (Nashik): वीजबिल कमी येईल, या आशेने सौर ऊर्जेकडे वळलेल्या ग्राहकांना आता राज्य सरकारने मोठा धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे.
यापूर्वीच नेटमीटरिंचा वापर करणा-या सोलर रूफटॉप ग्राहकांना त्यांची सौरवीज महावितरणला देतानाचे दर व महावितरणकडून वीज घेतानाचे दर यात फरक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता सौरऊर्जा निर्माण करीत असलेल्या ग्राहकांकडून आता वीज शुल्क वसूल करण्याचा सरकारचा विचार आहे. यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे.
धक्कादायक म्हणजे, जे ग्राहक सोलरमधून मिळणारी वीज स्वत:च वापरतात आणि महावितरणच्या ग्रीडला जोडलेले नाहीत, त्यांनाही आता या शुल्काच्या कक्षेत आणले जाणार आहे. म्हणजेच, ग्राहकांनी स्वत:ची वीज बनवून वापरली तरी त्यांना वीजशुल्क द्यावे लागणार आहे.
केंद्र सरकारने सौरऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी सूर्यघर योजना लागू केली आहे. या योजनेला घरगुती ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून देशभरात रोज ४० हजार घरांवर सौरऊर्जा केंद्र बसवले जातात. या सौरऊर्जेमुळे विजेचे दर कमी होतील. तसेच केंद्र सरकार यासाठी ७८ हजार रुपये अनुदान देत असल्याने ही योजना लोकप्रिय झाली आहे.
याशिवाय राज्य सरकारनेही उद्योग, शेतीसाठीही सौरऊर्जेला प्रोत्साहन दिले आहे. सौरऊर्जेवरील वीजपंपांसाठी सरकार ९० टक्क्यांपर्यंत अनुदान देत आहे. याशिवाय उद्योगांनाही सौरऊर्जा निर्मितीसाठी विशेष अनुदान दिले जाते. मात्र, सौरऊर्जा ही केवळ दिवसा तयार केली जात असून ही वीज साठवून ठेवण्याचे तंत्रज्ञान नसल्याने सौरऊर्जा अतिरिक्त झाली आहे.
या विजेचा वापर होत नसल्याने सरकारने यापूर्वीच विजेचे दर हे वीज वापराच्या वेळेनुसार ठरवण्याचा निर्णय घेतला असून, दिवसा वापरल्या जाणा-या विजेचे दर (टीओडी) हे रात्रीच्या वापरापेक्षा कमी ठेवले आहेत. याशिवाय सौरऊर्जेचे नेटमाटरींग म्हणजे महावितरणला वीज देणा-या ग्राहकांना यापूर्वी महावितरणला जितकी यूनिट वीज दिली, तेवढी यूनिट वीज मोफत वापरता येत होती. मात्र आता महावितरणने सौरऊर्जा निर्मिती करीत असलेल्या ग्राहकांकडून घेतली जाणारी वीज २.८२ रुपये असून त्या बदल्यात महावितरणकडून त्याच ग्राहकांनी वीज घेतल्यास त्याचे दर हे त्याच्या वापरानुसार (घरगुती, व्यापारी आदी) वेगवेगळे आकारले जाणार आहेत.
यापाठोपाठ आता सरकारने सौर पॅनेलद्वारे स्वत: वीज निर्मिती करणाऱ्या आणि ती वापरणाऱ्या ग्राहकांवर वीज शुल्क आकारण्याची तयारी सुरू केली आहे. यात आता स्वताःची वीज निर्माण करून स्वताःच वापर करीत असलेल्या ग्राहकांचाही समावेश करण्याचा निर्णय घेण्यासाठी समिती नेमली आहे.
ही समिती प्रामुख्याने स्वत:च्या वापरासाठी तयार केलेली वीज आणि ग्रीडला दिलेली वीज, यावर किती वीज शुल्क लावायचे, या दोन गोष्टींवर काम करणार आहे. या समितीत सर्व सरकारी अधिकारीच आहेत. ज्यांना महसूल गोळा करायचा आहे, ते निष्पक्ष निर्णय कसे घेणार? यात स्वतंत्र तज्ज्ञांचा समावेश असायला हवा होता, असे मत ऊर्जा तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
विजेचा वापर करण्याच्या वेळेनुसार विजेचे दर ठरवण्याचा नियम केल्यामुळे आधीच उद्योगांच्या वीज बिलात देखील मोठी वाढ झाली असताना आता उद्योगांनी निर्माण केलेल्या सौरऊर्जेवर वीजशुल्क आकारणा केल्यास, त्याचाही फटका घरगुती ग्राहकांसह उद्योगांना बसणार आहे.
सध्याचे ग्राहकनिहाय वीज शुल्क
(ग्राहक श्रेणी.....वीज शुल्क (टक्के))
कृषी ९.३०
उद्योग ९.३०
घरगुती १६
व्यावसायिक २१
अस्थायी २१
जाहिरात होर्डिंग २१