नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सुरू असलेल्या २५६ कामांपैकी मोठ्या संख्येने कामांची भौतिक प्रगती अत्यल्प असल्याचे मुख्यमंत्री आढावा बैठकीतील अहवालातून समोर आले आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरातील १९ यंत्रणांकडून ३४२ कामे मंजूर करण्यात आली असून, त्यातील २५६ कामे ही प्रत्यक्ष सुरू झाली आहेत. या प्रकल्पांच्या भौतिक प्रगतीचा आढावा नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. यावेळी घेतला तब्बल १२९ प्रकल्पांची कामे ही २५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे समोर आले आहे. एवढेत नाही, तर ५० टक्क्यांपेक्षा अधिक काम झालेल्या प्रकल्पांची संख्या केवळ ४१ आहे. यामुळे ही कामे मुदतीत म्हणजे ३१ मार्च २०२७ पर्यंत कशी पूर्ण होणार, याचे मोठे आव्हान संबंधित कार्यान्वयन यंत्रणा व कुंभमेळा प्राधिकरणासमोर आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत असून त्यासाठी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण, केंद्र सरकार, रेल्वे, हवाई उड्डयण मंत्रालय, ग्रामविकास विभाग आदींनी आतापर्यंत ३४७३२ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्या असून त्यातून नाशिक, त्र्यंबकेश्वर, शिर्डी आदी परिसरातील ३४२ कामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामांना साधारणपणे सप्टेंबर २०२५ पासून प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यातील २५६ कामांना कार्यादेश देऊन ती कामे प्रत्यक्षात सुरू झाली आहेत.
या सुरू असलेल्या कामांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. त्यात केवळ ४१ कामे ही ५० टक्क्यांपेक्षा पूर्ण झाली आहेत. त्या तुलनेत १२९ कामे २५ टक्क्यांच्या खाली असून सुमारे ३८ टक्के कामांची प्रगती अद्याप अत्यल्प आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ४६ कामे सुरू असून त्यातील ३१ कामांची प्रगती २५ टक्क्यांपेक्षा कमी असून ११ कामांची प्रगमती २५ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणा-या कामांपैकी केवळ चार कामे ५० टक्क्यांपेक्षा अधिक झालेली आहेत.
त्र्यंबक नगरपरिषदेच्या ३० कामांपैकी २० कामांची प्रगती २५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. नाशिक महापालिकेच्या ४५ सुरू कामांपैकी १५ कामे २५ टक्क्यांपेक्षा कमी, २७ कामे २५ ते ५० टक्के आणि केवळ तीन कामे ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रगतीवर आहेत. महावितरण कंपनीच्या २१ सुरू कामांपैकी १८ कामे २५ टक्क्यांपेक्षा कमी प्रगतीवर आहेत. जिल्हा परिषदेच्या १७ सुरू कामांपैकी १० कामे ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाली असल्याचे नमूद केले असले, तरी या कामांच्या आकडेवारीबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, नाशिक महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसईडीसीएल आणि त्र्यंबक नगरपरिषद यांसारख्या सिंहस्थाच्या दृष्टीने महत्त्वाच्या यंत्रणांच्या अनेक कामांची प्रगती २५ टक्क्यांच्या खाली आहे. अहवालात २५ टक्क्यांखालील प्रगती असलेल्या कामांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची ३१, त्र्यंबक नगरपरिषदेची २० आणि एमएसईडीसीएलची १८ कामे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या तीन विभागांतीलच ६९ कामे २५ टक्क्यांखाली आहेत. एकूण प्रकल्पांच्या प्रत्यक्ष प्रगतीचा विभागनिहाय सरासरी आढावा घेतल्यासही कामांची गती अपेक्षेपेक्षा मागे असल्याचे चित्र आहे. ३४२ प्रकल्पांची सरासरी प्रत्यक्ष भौतिक प्रगती २७.४३ टक्के आहे, तर या टप्प्यावर अपेक्षित सरासरी प्रगती ४४.१३ टक्के होती. म्हणजेच प्रत्यक्ष प्रगती अपेक्षेपेक्षा १६.७ टक्के कमी आहे. त्यामुळे सिंहस्थाच्या तयारीसाठी कामांचा वेग वाढविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
कुंभमेळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्यासाठी उर्वरित कालावधीत कामांच्या भौतिक प्रगतीचा वेग लक्षणीयरीत्या वाढवावा लागणार आहे. आतापर्यंत पावसाळ्याचे कारण देऊन या कमी वेगाचे समर्थन केले गेले. मात्र, आता पावसाने उघडीप दिली असून या काळात कामांचा वेग वाढवून ही तूट भरून काढावी लागणार आहे.
Key Points
सिंहस्थासाठी ३४२ कामांना मंजुरी
त्यापैकी २५६ कामे प्रत्यक्ष सुरू
१२९ कामांची प्रगती २५ टक्क्यांपेक्षा कमी
केवळ ४१ कामे ५० टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण
३४२ प्रकल्पांची सरासरी भौतिक प्रगती २७.४३ टक्के
अपेक्षित सरासरी प्रगती ४४.१३ टक्के होती
प्रत्यक्ष प्रगती अपेक्षेपेक्षा १६.७ टक्के कमी
सार्वजनिक बांधकाम विभागाची ३१ कामे २५ टक्क्यांखाली
त्र्यंबक नगरपरिषदेची २० कामे २५ टक्क्यांखाली
महावितरणची १८ कामे २५ टक्क्यांखाली
३१ मार्च २०२७ पर्यंत कामे पूर्ण करण्याचे आव्हान