Simhastha Maha Kumbh Mela, nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

सिंहस्थ वर्षभरावर आला; कामे वेळेत पूर्ण होणार का?

₹23,000 कोटींचे प्रकल्प वेळेत पूर्ण करा; मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचे निर्देश

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर मंजूर ₹23 हजार कोटींच्या विकासकामांना वेग देण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यात विविध प्रकल्पांची पाहणी केली. उरलेल्या अवघ्या वर्षभरात ही कामे वेळेत आणि दर्जेदार पूर्ण करण्याचे मोठे आव्हान असल्याने त्यांनी यंत्रणांना कडक सूचना दिल्या.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी प्रत्यक्ष पाहणी मोहीम सुरू केली आहे. तीन दिवसांच्या या दौऱ्यात त्यांनी विविध महत्त्वाच्या प्रकल्पांना भेट देत कामांच्या गती आणि दर्जावर विशेष भर दिला.

सिंहस्थासाठी सुमारे ₹23 हजार कोटींच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, ही कामे पूर्ण करण्यासाठी आता केवळ वर्षभराचा कालावधी शिल्लक असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य सचिवांनी प्रत्येक प्रकल्पाची सखोल माहिती घेत प्रगतीचा आढावा घेतला.

पहिल्या दिवशी द्वारका सर्कल येथील भुयारी मार्ग, तपोवनातील समांतर पूल, कपिला संगम, साधुग्राम परिसर तसेच गोदावरी नदीकाठावरील घाटांच्या कामांची पाहणी करण्यात आली. याशिवाय मलजल शुद्धीकरण प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन आणि जलशुद्धीकरण प्रकल्पांनाही त्यांनी भेट दिली.

दुसऱ्या दिवशी रेल्वे स्थानक विकास, रस्ते प्रकल्प, विमानतळ विस्तारीकरण आणि पार्किंग सुविधांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. ओढा, नाशिक रोड, देवळाली, खेरवाडी आदी स्थानकांवरील सुविधांची पाहणी करताना भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक असलेल्या बस कनेक्टिव्हिटी आणि प्रवासी व्यवस्थापनाबाबतही चर्चा झाली.

मुख्य सचिवांनी यंत्रणांना कामांची गती वाढवण्याचे निर्देश देताना कोणत्याही तांत्रिक किंवा प्रशासकीय अडचणी तात्काळ निदर्शनास आणण्यास सांगितले. एकदा सुरू केलेली कामे थांबू नयेत, तसेच सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवून कामे वेळेत पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

या पाहणी दौऱ्यात विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सिंहस्थाशी संबंधित सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

मुख्य सचिवांचा नाशिक दौरा...

  • सिंहस्थासाठी ₹23 हजार कोटींची विकासकामे

  • मुख्य सचिवांचा 3 दिवसांचा नाशिक दौरा

  • घाट, पूल, रेल्वे व ड्रेनेज प्रकल्पांची पाहणी

  • 1 वर्षात कामे पूर्ण करण्याचे मोठे आव्हान

  • कामांची गती वाढवण्याचे निर्देश

  • विभागांमध्ये समन्वयावर भर