

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या अनुषंगाने नाशिक शहरातील पायाभूत सुविधा विकासाला गती देण्यासाठी ६६.१५ कि.मी. लांबीच्या नाशिक रिंगरोडच्या बांधकामांसाठी ३ हजार ९५४ कोटी रुपयांच्या खर्चासह इतर कामांसाठी ४१०० कोटी रुपयांची तरतूद करण्यास सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मान्यता दिली आहे.
यावेळी सिंहस्थ काळात विविध उपक्रम, मोहिमा व सार्वजनिक कार्यक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावी आणि सुसंगत पद्धतीने पोहोचण्यासाठी योग्य संवाद, सर्जनशील मल्टिमिडिया निर्मिती आणि डिजिटल माध्यमांचा समन्वित वापर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे दुरदृश्यप्रणालीद्वारे, तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील बैठकीस उपस्थित होते.
सिंहस्थ परिक्रमा तथा नाशिक रिंगरोड या प्रकल्पासाठी जमीन संपादनास यापूर्वीच प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. प्रस्तावित नाशिक रिंगरोडची लांबी ६६.१५ किलोमीटर आहे. रिंगरोड डीआरडीओ जंक्शन (राष्ट्रीय महामार्ग ६०) पासून सुरू होऊन शहराला वळसा घालत पुन्हा त्याच महामार्गाला जोडला जाणार आहे.
हा मार्ग काही ठिकाणी चारपदरी व काही ठिकाणी सहापदरी असून त्यावर पाच मोठे पूल, दोन रेल्वे उड्डाणपूल, आठ ठिकाणी वाहन अंडरपास असणार आहे. हा मार्ग चार राष्ट्रीय महामार्ग व चार राज्यमार्गांना जोडणारा आहे. या मार्ग उभारणीच्या कामासाठी यापूर्वीच तांत्रिक मान्यता मिळालेली असल्याने कुंभमेळा प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. गेडाम यांनी ३९५४ कोटींच्या कामास प्रशासकीय मान्यता दिली. यासाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी संबंधित विभागांना सर्व प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून कामे निश्चित कालमर्यादेत सुरू करण्याचे निर्देश दिले. विशेषतः रिंगरोड प्रकल्पामुळे नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्थेला दीर्घकालीन दिलासा मिळेल तसेच भविष्यातील शहरी गतिशीलता अधिक सुसंगत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली कामे
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे ध्वजस्तंभ उभारणे (७.०९ कोटी)
ब्रह्मगिरी पर्वत, ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्ग, अंजनेरी पर्वतावर पायाभूत सुविधी उभारणे २३.१२ कोटी
गोदावरी–नंदिनी नदी संगमाच्या उजव्या काठावर ३०० मीटर घाट बांधणेः ४४.५३ कोटी
कर्मा हाइट्स ते तपोवन एसटीपी व नांदूर गावापर्यंत रस्ताः २०.२२ कोटी
सिंहस्थ वाहतूक नियोजन वैज्ञानिक पद्धतीने करण्यासाठी आयआयएम नागपूरमार्फत एकात्मिक गतिशीलता आराखडाः १०.२४ कोटी
त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयाच्या स्थलांतर व भाडेः १.७२ कोटी
कावनई (कपिलधारा तीर्थ) येथे विकासकामेः २७.४७ कोटी
चक्रतीर्थ (चाकोरे–बेझे परिसर) येथे विकासकामे २४.१० कोटी
टाकेद येथे पायाभूत सुविधा विकासः २१.९१ कोटी