samruddhi expressway Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Samruddhi Expressway: ट्रक टर्मिनसची संख्या घटवली; 9 ऐवजी 4 ठिकाणांसाठी नव्याने टेंडर

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): समृद्धी महामार्गावर ट्रक चालकांसाठी अत्यावश्यक सुविधा उभारण्याच्या प्रकल्पाला गती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) समृद्धी महामार्गाच्या दोन्ही कॉरिडॉरवरील चार ट्रक टर्मिनसच्या बांधकाम व देखभालीसाठी नव्याने टेंडर प्रसिद्ध केले आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०२६ मध्ये काढलेल्या टेंडरमध्ये ट्रक टर्मिनल उभारण्यासाठी तब्बल नऊ ठिकाणांचा समावेश होता. या नव्या टेंडरमध्ये केवळ चार ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे ट्रकटर्मिनसची गुंतवणूक १७५ कोटींवरून ९५ कोटींपर्यंत खाली येणार आहे.
 

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर प्रवाशी व वाहनचालक यांच्या सुरक्षेसाठी १६ ठिकाणी (वे साईड अमिनीटीज) सुविधा उभारल्या जात आहेत. त्यात प्रामुख्याने ठराविक अंतरावर वाहने थांबवून फूडकोर्ट, स्वच्छता गृह, वाहनतळ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यामुळे वाहन चालकांना सतत एका वेगाने व सरळ रेषेत वाहन चालवण्यातून होणारे संमोहन दूर होण्यास मदत होईल. मात्र, त्या ठिकाणी केवळ लहान वाहनांची सोय होऊ शकणार असल्याने समृद्धीच्या दोन्ही बाजूनी साधारण नऊ ठिकाणी ट्रक टर्मिनस उभारून अवजड वाहने व चालकांना सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने ट्रक टर्मिनस उभारण्यासाठी इच्छुकांकडून देकार मागावण्यासाठी फेब्रुवारीमध्ये टेंडर प्रसिद्ध केले होते. फेब्रुवारीमध्ये प्रसिद्ध झालेल्या टेंडरमध्ये मुंबई कॉरिडॉरवरील शिवणी, वारझडी, मर्हळ आणि शेलवली, तर नागपूर कॉरिडॉरवरील रेणकापूर, शिवणी, वारझडी, मर्हळ आणि आमणे अशा नऊ ठिकाणांचा समावेश होता.

या नऊ ठिकाणांची एकूण जमीन आणि अपेक्षित गुंतवणूक लक्षात घेऊन निविदा मागविण्यात आली होती. मात्र, त्या टेंडरची प्रक्रिया पूर्ण न करता महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉरवरील शिवणी (६.५४ हेक्टर) व मर्हळ (५.२२ हेक्टर) आणि नागपूर कॉरिडॉरवरील रेणकापूर (२.६ हेक्टर) व शिवणी (१० हेक्टर) या चारच ठिकाणी ट्रक टर्मिनस उभारण्यासाठी टेंडर प्रसिद्ध केले आहेत.

फेब्रुवारीच्या टेंडरमधील वारझडी, शेलवली आणि आमणे ही ठिकाणे नव्या टेंडरमधून वगळण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, नव्या टेंडरमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या चारही ठिकाणांसाठी किमान अपेक्षित गुंतवणुकीत बदल केलेला नाही. मुंबई कॉरिडॉरवरील शिवणीसाठी २५ कोटी रुपये, मर्हळसाठी २० कोटी रुपये, नागपूर कॉरिडॉरवरील रेणकापूरसाठी १० कोटी रुपये, तर शिवणीसाठी ४० कोटी रुपये अशी ९५ कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे.

बांधकामासाठी दुप्पट मुदत
फेब्रुवारीच्या टेंडरमध्ये ट्रक टर्मिनसची ऑपरेशनल रेडिनेस सहा महिन्यांत आणि संपूर्ण प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत १२ महिन्यांची देण्यात आली होता. या नव्या टेंडरमध्ये ही मुदत दुप्पट करण्यात आली आहे. आता पहिल्या टप्प्यात १२ महिन्यांत तर दुसऱ्या टप्प्यात २४ महिन्यांत संपूर्ण काम करण्याची मुदत देण्यात आली आहे.

एमएसआरडीसीकडील जमीन ६० वर्षांच्या लीजवर विकासकाला देण्यात येणार असून, निवड झालेल्या विकासकाने स्वतःच्या खर्चाने ट्रक टर्मिनसचे नियोजन, डिझाइन, अभियांत्रिकी, वित्तपुरवठा, बांधकाम तसेच पुढील व्यवस्थापन व देखभाल करायची आहे. यासाठी विकासकाला अपफ्रंट लीज प्रीमियम नमूद करावा लागणार असून, सर्वाधिक प्रीमियम देणाऱ्या बोलीदाराची निवड केली जाणार आहे.

नव्या टेंडरमधील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ट्रक टर्मिनसच्या पार्किंगमधून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नातील ४० टक्के हिस्सा एमएसआरडीसीला द्यावा लागणार आहे. उर्वरित उत्पन्न विकासकाला मिळणार आहे. ट्रक टर्मिनसचे संचालन, सुरक्षा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन आणि देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारीही विकासकावर राहणार आहे.

ट्रक टर्मिनसमधील सुविधा
नव्या टेंडरमधील तांत्रिक अटींनुसार ट्रक टर्मिनसमध्ये दोन, तीन तसेच मल्टी-ॲक्सल वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, अंतर्गत वाहतूक मार्ग, प्रवेश-निर्गमन नियंत्रण, सुरक्षा व्यवस्था, चालकांसाठी किमान ४० बेडचे विश्रांतीगृह, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, कॅन्टीन व स्वयंपाकाची सुविधा, वाहनांच्या किरकोळ दुरुस्तीची व्यवस्था, ट्रक वॉश सुविधा, स्मार्ट पार्किंग व्यवस्थापन, सीसीटीव्ही व डिजिटल प्रणाली यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पायाभूत सुविधा, ड्रेनेज, लँडस्केपिंग, अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन सेवांसाठीही तरतुदी करण्यात आल्या आहेत.

आधीच्या टेंडरला १५ बोली
फेब्रुवारी २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या टेंडरच्या नोंदीनुसार या प्रक्रियेत १५ बोली प्राप्त झाल्या आणि जूनमध्ये तांत्रिक व आर्थिक मूल्यमापनाची नोंद झाली. पुढे मात्र, काहीही निर्णय न घेता आता एमएसआरडीसीने चार ठिकाणांपुरती मर्यादित करून नवीन टेंडर प्रसिद्ध केले आहे.