

नाशिक (Nashik): महाराष्ट्र सरकार आषाढवारीसाठी राज्यभरातून निघणा-या पालखी सोहळ्यांतील वारक-यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुक्तहस्ताने निधी उपलब्ध करून देत असले, तरी सरकारी बाबूंनी ठेकेदारांच्या संगनमताने त्या निधीची उधळपट्टी करण्याचे धोरण स्वीकारले आहे की काय, असा प्रश्न संत निवृत्तीनाथ संस्थानच्या त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या पायीदिंडी सोहळ्यात वारक-यांसाठी स्वच्छतागृह पुरवण्याच्या टेंडरमुळे पडत आहे.
त्र्यंबकेश्वर येथून २९ जून रोजी संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. या दिंडीतील वारक-यांसाठी रोज ५०० शौचालय पुरवण्यासाठी ३ कोटी ९० लाख रुपयांचे टेंडर नाशिक जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने टेंडर प्रसिद्ध केले आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा शौचालयांची संख्या दुपटीने वाढवण्यात आली आहे. यावर्षी दिंडीमध्ये वारक-यांची संख्या वाढून दुप्पट होणार असल्याची कोणतीही माहिती नसताना ही संख्या वाढवल्यामुळे ही शंका उपस्थित होत आहे.
संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थानकडून दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला आषाढवारीसाठी पालखीसोहळा त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान करतो. या वारीमध्ये हजारो वारकरी सहभागी होत असतात. या वारक-यांसाठी दिंडी मार्गावर स्वच्छतागृह पुरवण्यासाठी तसेच दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून निधी पुरवला जातो. या निधीतील कामांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नाशिक जिल्हा परिषदेवर सोपवली आहे.
नाशिक जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने स्वच्छतागृह व स्वच्छता कर्मचारी पुरवण्यासाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे. त्यात प्रत्येक स्वच्छतागृह पुरवण्यासाठी साधारण २४०० रुपये खर्च अपेक्षित आहे. त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या दरम्यान दिंडीचे ३० मुक्काम गृहित धरण्यात आले असून त्यासाठी प्रत्येकी ५०० याप्रमाणे १५ हजार स्वच्छतागृह पुरवले जाणार आहेत. तसेच परतीच्या मार्गावर १८ दिवस रोज ७० याप्रमाणे १२६० स्वच्छतागृह पुरवायचे आहेत. त्या स्वच्छतागृह पुरवण्याच्या टेंडरची किंमत ३ कोटी ९० लाख रुपये आहे.
मागील वर्षी दिंडीसाठी स्वच्छतागृह पुरवण्याच्या दिवसांची संख्या २६ होती, ती वाढवून यंदा ३० करण्यात आली आहे. तसेच मागील वर्षी पंढरपूरला जाताना रोज पुरवण्याच्या स्वच्छतागृहांची संख्या २५० होती, तिच्यात दुप्पट वाढ करण्यात आली आहे.
तसेच पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर या परतीचमय् मार्गावरील स्वच्छतागृहांची संख्या ५० वरून ७० करण्यात आली आहे. याबाबत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांनी सांगितले की, या दिंडी सोहळ्यात नगरपासून वारक-यांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढते. यामुळे देवस्थानच्या मागणीनुसार ही संख्या वाढवण्यात आली आहे. मात्र, वारक-यांची संख्या नगर शहरापासून पुढे वाढणार असेल, तर त्यासाठी त्र्यंबकेश्वरपासूनच ती संख्या दुप्पट करण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याशिवाय दिंडी पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी ठराविक वारकरी थांबतात व तेच वारकरी परतीच्या मार्गावर दिंडीसोबत असतात. तरीही पंढरपूरमध्ये मुक्कामाच्या ठिकाणी ५०० स्वच्छतागृहे चार दिवस ठेवण्याचा हेतु काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
५०० स्वच्छतागृह कुठे ठेवणार?
५०० स्वच्छतागृह उभी करण्यासाठी किमान एक एकरपेक्षा अधिक जागा लागणार आहे. दिंडीच्या मुक्कामाची बहुतांश ठिकाणे ही खेडेगावातील गावठाणांमध्ये आहेत. त्या ठिकाणी स्वच्छतागृह उभी करण्यासाठी एवढी जागा कुठे उपलब्ध होणार, याचाही विचार स्वच्छतागृहांची संख्या वाढवताना केलेला दिसत नाही. वारक-यांच्या मागणीचा विचार करायचा होता, तर अहिल्यानगरपासून ही संख्या वाढवता आली असती. मात्र, ठेक्याची रक्कम वाढवून सरकारी निधी खर्च करण्याच्या दृष्टीकोनातून ही संख्या वाढवली असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
टेंडरकालावधी केवळ सहा दिवसांचा
ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार दीड कोटींपेक्षा अधिक रकमेच्या टेंडरसाठी १५ दिवसांचा कालावधी असतो. मागील वर्षी ग्रामविकास विभागाने पालखी सोहळ्यातील कामांसाठी विशेष शासननिर्णयाद्वारे हा कालावधी कमी करून आठ दिवसांचा केला होता. तो शासननिर्णय केवळ १८ जुलै २०२५ पर्यंत लागू होता. यावर्षी तसा काहीही निर्णय घेतलेला नसताना नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने हा कालावधी केवळ ६ दिवसांचा केला आहे.
याबाबत संबंधित अधिकारी यांना कालावधीबाबत विचारले असता त्यांनी आम्ही विशेष परवानगी घेतली असल्याचे उत्तर दिले. मात्र, त्या विशेष परवानगीचे पत्र ते सादर करू शकले नाही. यामुळे टेंडरमधील कालावधी त्यांच्याच पातळीवर परस्पर निश्चित केला असल्याचे दिसत आहे.
स्पर्धा टाळण्याचा प्रयत्न?
मागील वर्षी याच पालखी सोहळ्यातील वारक-यांसाठी रोज २५० व परतीच्या प्रवासासाठी रोज ५० याप्रमाणे स्वच्छतागृह पुरवण्यासाठी टेंडरमध्ये २५०० रुपये दर ठरवला होता. त्यावेळी त्यात स्पर्धा होऊन एका ठेकेदाराने २.५ कोटींचे काम अवघे दीड कोटीत केले होते. यावर्षीच्या टेंडरमध्ये प्रती स्वच्छतागृहाचा दर २४०० रुपये ठरवण्यात आला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या टेंडरमध्ये या दराने ठेका निश्चित केला असल्याने याच दराने जळगाव व नाशिकमध्ये टेंडर देण्यात यावे, अशा तोंडी सूचना असल्याची चर्चा आहे. यामुळे मागीलवर्षीप्रमाणे यंदा स्पर्धा होणार नाही, यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
पालखी सोहळ्यात नगरपासून वारक-यांची संख्या वाढते, यामुळे देवस्थानच्या मागणीनुसार यंदा स्वच्छतागृहांची संख्या वाढवून ५०० करण्यात आली आहे. तसेच पंढरपूरमध्येही मुक्काम असतानाच्या काळात स्वच्छतागृह पुरवण्याची मागणी केली होती. त्यानुसार स्वच्छतागृह पुरवण्याचे दिवस ३० करण्यात आले आहे.
- दीपक पाटील, उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता विभाग), जिल्हा परिषद, नाशिक.