Kumbh Mela Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: सिंहस्थामुळे वाढणार त्र्यंबकेश्वरची कनेक्टिव्हिटी; काय आहे प्लॅन?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोठ्याप्रमाणावर निधी देणार असल्याने आतापर्यंत जवळपास २५ हजार कोटींच्या कामांना तत्वता मान्यता मिळाली आहे. नाशिक हे मोठे शहर असल्याने प्रत्येक सिंहस्थात अधिकाधिक निधी त्याच भागासाठी मिळत असतो. या सिंहस्थात त्र्यंबकेश्वर परिसरातील रस्त्यांसाठीही राज्य सरकारने मोठा निधी देऊ केला आहे.

या सिंहस्थाच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वरला थेट जोडणा-या दहा रस्तांची जवळपास  २३५० कोटींची कामे होणार असून त्र्यंबकेश्वरच्या चारही बाजूंनी होणा-या या रस्त्यांमुळे त्र्यंबकेश्वरची कनेक्टिव्हिटी वाढून सिंहस्थानंतरही त्याचा पर्यटनवाढीसाठी मोठा फायदा होणार आहे.

त्र्यंबकेश्वर हे पश्चिम घाटावरील एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे. यामुळे येथ त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. मात्र, त्र्यंबकेश्वर हे ब्रह्मगिरीच्या कुशीतील एक छोटेसे गाव असून तेथून नाशिकला जोडणारा एकमेव रस्ता चौपदरी आहे. यामुळे भाविकांना त्र्यंबकेश्वरला येण्यासाठी नाशिक- त्र्यंबकेश्वर या एकमेव रस्त्याचा आधार घ्यावा लागतो. यामुळे मोठा वळसा घालावा लागतो.

तसेच नाशिक शहरातील वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतो. यामुळे अनेकदा इच्छा असूनही भाविक त्र्यंबकेश्वरला येणे टाळत असतात. मात्र, यावेळच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वरला जोडणा-या रस्त्यांचा दुष्काळ हटवण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी जवळपास दहा मार्ग मंजूर करण्यात आले असून या मार्गांमुळे आता बाहेरील भाविकांना त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी नाशिक शहरातून जाण्याची गरज भासणार नाही.

त्याचप्रमाणे भाविक ज्या दिशेने येत असतील, त्या बाजूने त्यांना त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी चांगले व चौपदरी रस्ते उपलब्ध असणार आहे. यामुळे त्यांचा प्रवास वेगाने व सुरक्षित होऊ शकणार आहे. मुंबई आग्रा महागार्गाने येणारे भाविक रिंगरोडच्या माध्यमातून नाशिक-त्र्यंबकेश्वर या सहापदरी रस्त्याने त्र्यंबकेश्वरला जाऊ शकणार आहेत.

तसेच समृद्धी महामार्गाने नागपूर अथवा मुंबई या दोन्ही बाजूंनी येणा-या भाविकांसाठी घोटी- त्र्यंबकेश्वर हा त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी जवळचा चौपदरी मार्ग प्रस्तावित केला आहे. हा रस्ता ठाणे-पालघरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाढवण बंदरापर्यत नेला असल्यामुळे पश्चिम मुंबई. डहाणू, गुजरात मार्गे येणा-या भाविकांनाही आता या चौपदरी मार्गाचा वापर करून त्र्यंबकेश्वरला येता येणार आहे.

तसेच गुजरातहून सापुतारा नाशिक व पेठ-नाशिक या मार्गाने येणा-या भाविकांना आता त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी नाशिक शहरात येण्याची गरज भासणार नाही. त्यांना पेठ- तोरंगण-हरसूल-वाघेरा- अंबोली-पहिने वआडगाव- गिरणारे-वाघेरा- हरसूल- ओझरखेड  या मार्गांनी थेट त्र्यंबकेश्वरला जाता येणार आहे. या सर्व रस्त्यांची कामे सिंहस्थ कुंभमेळ्यापर्यंत पूर्ण झाल्यानंतर त्र्यंबकेश्वर येथे येणा-या भाविकांच्या संख्येत आणखी वाढ होऊ शकणार आहे.

त्र्यंबकेश्वरला जोडणारे रस्ते

  • नाशिक - त्र्यंबकेश्वर काँक्रिटीकरण : ३५० कोटी रुपये

  • घोटी-पेगलवाडी- त्र्यंबकेश्वर-सापगाव- १३४१ कोटी रुपये

  • त्र्यंबकेश्वर-तुपादेवी फाटा-तळवाडे-उमराळे-दिंडोरी-पालखेड जोपुळ-पिंपळगाव : २१५ कोटी

  • पेठ- तोरंगण-हरसूल-वाघेरा- अंबोली-पहिने- घोटी रस्ता : २०५ काटी

  • आडगाव- गिरणारे-वाघेरा- हरसूल- ओझरखेड रस्ता : १०० कोटी

  • राजेवाडी-बेजे-तळवाडे-पिंपळद- त्र्यंबक-शिरसगाव- ५० कोटी

  • बेजे फाटा ते बेजे- २५ कोटी 

  • अंजनेरी मुळेगाव जातेगाव- ३५ कोटी रुपये

  • सापगाव वाहनतळ ते शिरसगाव फाटा - २१ कोटी

  • वेळुंजे ते गणेशगाव पिंप्री- २६ कोटी रुपये