Nashik City, nmc, Kumbh Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: सिंहस्थाच्या निमित्ताने प्राचिन गोंदेश्वर मंदिराचेही होणार सुशोभिकरण; अंदाजपत्रकासाठी पीडब्लूडीचे दरटेंडर

सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिराचे पुनरुज्जीवन होणार

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमिवर नाशिक जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळांची विकास केला जात आहे. तसेच प्राचिन मंदिरांचा जिर्णोद्धार, सुशोभिकरण केले जात आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यात पायाभूत सुविधांबरोबरच पर्यटन वाढीसाठीही प्रकल्पांची उभारणी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक जिल्ह्यातील प्राचिन मंदिरापैकी एक असलेल्या सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिराचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाचे अंदाजपत्रक तयाकर करण्यासाठी दगडातील कोरीव काम, दगडी शिल्प आदी दरसूचित नसलेल्या वस्तूंचे दर मागवण्यासाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे.

सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर ११व्या-१२व्या शतकात बांधले गेले असल्याचे इतिहासकारांचे म्हणणे आहे. यादव राजा गोविंदराज (गोविंददेव) याच्या नावावरून या मंदिराला गोविंदेश्वर आणि पुढे अपभ्रंश होऊन गोंदेश्वर हे नाव पडल्याची मान्यता आहे. सिन्नर ही यादवांची प्रारंभीची राजधानी असल्यामुळे या मंदिराला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

गोंदेश्वर मंदिर हेमाडपंथी नव्हे, तर भूमिज शैलीतील नागर स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना मानले जाते. या मंदीराची पंचायतन पद्धतीची रचना असून मध्यभागी भगवान शिवाचे मुख्य मंदिर, चारही कोपऱ्यांमध्ये विष्णू, गणेश, सूर्य आणि देवी यांची उपमंदिरे आहेत. मंदिर पूर्णपणे काळ्या बेसॉल्ट दगडात बांधलेले आहे. दगडांची जुळणी अत्यंत अचूक असून चुन्याचा वापर अत्यल्प किंवा जवळपास नाही.

उंच शिखरावर भूमिज शैलीची लहान-लहान उपशिखरे असून समोर स्वतंत्र नंदी मंडप आहे. बाह्य भिंतींवर देव-देवता, अप्सरा, गंधर्व, नर्तक, प्राणी, वेली आणि भूमितीय नक्षीकाम कोरलेले आहेत. रामायण, महाभारत आणि पुराणातील प्रसंग, शिवाच्या विविध रूपांचे शिल्पांकन, नृत्यांगना (सुरसुंदरी) आणि संगीतकार, हत्ती, सिंह, मकर, हंस यांसारख्या प्राण्यांची शिल्पे, फुलांच्या व वेलबुट्टीच्या आकर्षक नक्षी आणि अत्यंत प्रमाणबद्ध आणि जिवंत भासणारे कोरीवकाम आहे.

गोंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वाधिक सुस्थितीत असलेल्या मध्ययुगीन दगडी मंदिरांपैकी एक आहे. मात्र, अलिकडच्या काळात त्याची काही ठिकाणी पडझड झाली आहे. काहीठिकाणी दगड निखळले आहेत. त्याच्या देखभालीकडे विशेष लक्ष नसल्याने हा ऐतिहासिक ठेवा लयास जात आहे. यामुळे सिंहस्थाच्या निमित्ताने या मंदिराचा जिर्णोद्धार तसेच त्याचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय कुंभमेळा प्राधिकरणने घेतला आहे.

या मंदिराचे संरक्षण भारतीय पुरातत्व विभागाकडे असून त्यांच्या देखरेखीखाली मंदिराची संरक्षक भींत, प्रवेशद्वार सुशोभिकरण, दगडीशिल्पकला, माहिती फलक, पर्यटक सुविधा ही कामे करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार या कामातील काही वस्तू या जिल्हा दरसूचीमध्ये (डीएसआर) येत नाही. यामुळे या कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या वस्तूंचे दर मागवण्यासाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे.

यात अनुभवी व नामांकित संस्ठांकडून ऑनलाईन दरपत्रके मागवण्यात आली असून त्यात प्रामुख्याने भिंतीवरील हाय-रिलीफ दगडी कोरीवकाम करण्यासाठी कोल्हापूर, नांदेड, वैजापूर यापैकी कोणत्याही ठिकाणचा काळा बेसॉल्ट दगड वापरून विविध आकारातील कलात्मक हाय-रिलीफ कोरीवकाम, मानवी आकृती, प्राणी, पाने, फुले, सजावटीच्या आकृत्या इत्यादींची निर्मिती, वाहतूक व बसविणे या कामांचा समावेश आहे.

तसेच कमानीवरील व बाजूच्या सिंहमूर्ती बसवण्यासाठी कमानीवरील व बाजूच्या सिंहांच्या पूर्णाकृती शिल्पांची निर्मिती, वाहतूक व बसविणे या कामांचे दर मागवले आहेत. याशिवाय मोठ्या सिंहाची पूर्णाकृती मूर्ती बसवण्यात येणार असल्याने यामोठ्या सिंहाची पूर्ण आकाराची शिल्पकृती तयार करणे, वाहतूक करणे व बसविणे, याचेही दर मागवण्यात आले आहे.  या शिल्पांव्यतिरिक्त गोंदेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर तांब्याच्या धातूमध्ये तायर करण्यात आलेल्या फलकाचेही दर मागवण्यात आले आहेत.