Sinar MIDC Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: सिन्नरला औद्योगिक भूखंड विक्रीत एमआयडीसी नफेखोरी करतेय का?

सिन्नर इंडस्ट्रिअल ॲंड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे गंभीर आरोप

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून सिन्नर औद्योगिक क्षेत्रातील माळेगाव टप्पा क्रमांक एक व मापारवाडी टप्पा क्रमांक चार येथील औद्योगिक भूखंड विक्रीची ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे. या भूखंडांचे दर ५७०० रुपये प्रति चौरसमीटर निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, हे दर एमआयडीसीने जमीन अधिग्रहण केलेल्या दराच्या जवळपास चारपट अधिक असल्याचा दावा करीत सिन्नर इंडस्ट्रिअल ॲंड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (सीमा) या भूखंड विक्रीला विरोध केला आहे.

एमआयडीसीने उद्योजकांना रास्त दरात भूखंड उपलब्ध करून देण्यापेक्षा नफेखोरी केली जात असल्याने 'सीमा'ने आंदोलनाचा इशारा दिला आहे. एमआयडीसीने यापूर्वी सिन्नर परिसरात केवळ १३०० ते १५०० रुपये प्रतिचौरस मीटरने भूखंड विक्री केली असताना आता त्या दरांमध्ये चौपटीपेक्षा अधिक वाढ केली आहे.

सिन्नर तालुक्यात माळेगाव येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीचा विस्तार करण्यासाठी एमआयडीसीने माळेगाव टप्पा क्रमांक एक व मापारवाडी टप्पा क्रमांक चारसाठी अलिकडेच भूसंपादन केले. माळेगाव येथील शेतकऱ्यांकडून ५२ लाख रुपये प्रति एकर दराने जमीन खरेदी करण्यात आली. त्यानंतर त्याचे विकसित भूखंड तयार करून ते उद्योजकांना विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. मात्र, एमआयडीसीने निश्चित केलेल्या दरानुसार या भूखंडांची किंमत प्रतिएकर दोन कोटी १६ लाख रुपये आहे.

त्याचप्रमाणे मापारवाडी टप्पा क्रमांक चार येथे ५६ लाख रुपये प्रति एकर या दराने घेतलेली जमीन दोन कोटी २८ लाख प्रति एकरने विक्रीस ठेवण्यात आली आहे. एमआयडीसीने तब्बल चारपट दर आकारून उद्योजकांची लूट केली जात असल्याचा आरोप सिन्नर येथील उद्योजकांच्या 'सीमा' संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

माळेगाव - मापारवाडी हा भाग ग्रामपंचायत हद्दीतील म्हणजे ग्रामीण औद्योगिक क्षेत्रात मोडतो. तरीरी त्या ठिकाणी ५७०० रुपये प्रति चौरसमीटर असा दर निश्चित करण्यात आला आहे. त्याचवेळी नाशिक महानगरपालिका हद्दीतील अंबड औद्योगिक वसाहतीत विकसित भूखंडांचा दर ६०७० रुपये प्रति चौरस मीटर आहे. म्हणजे एमआयडीसीने ग्रामीण व महानगरपालिका क्षेत्रातील भूखडांच्या दरातील फरक केवळ ३०० रुपये ठेवला आहे.

सिन्नर एमआयडीसी (सी - विभाग) ची तुलना प्रगत नाशिक औद्योगिक वसाहतीशी केल्याने उद्योजकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे एमआयडीसीने यापूर्वी या भागातील विकसित भूखंडांची विक्री ही १३०० ते १५०० रुपये प्रतिचौरस मीटर याप्रमाणे केली आहे. या अवास्तव दरांमुळे खऱ्या उद्योजकांना भूखंड परवडणार नाहीत. मात्र, गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात भूखंड खरेदी करून साठेबाजी करतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. भूखंड विक्री प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक ठेवावी, अशी मागणी होत आहे.

माळेगाव, मापारवाडी परिसरात औद्योगिक भूखंडांचे दर एवढ्यामोठ्या प्रमाणात वाढवल्यामुळे खऱ्या उद्योजकांनी ते परवडणार नाहीत. यामुळे ते या भूखंडांचे तुकडे करून विक्री करण्याचा धोक वाढला आहे. यामुळे भूखंडांचे तुकडे करून त्याची विक्री करून देणारे एजंट वाढून औद्योगिक विकासाला खीळ बसण्याचा धोकाही व्यक्त केला जात आहे.

एमआयडीसीने वाजवी नफा मिळवत भूखंड उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी संघटनेचे सचिव बबन वाजे यांनी केली आहे. या प्रश्नावर लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात येणार असून या अन्यायकारक दरांविरोधात तीव्र आवाज उठवला जाणार असल्याचे वाजे यांनी स्पष्ट केले.