Kumbh Mela Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी मंत्री नितीन गडकरींनी काय घेतला निर्णय; 2 हजार 500 कोटी खर्चून...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : नाशिक येथील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नऊ महामार्ग व रस्त्यांच्या विकासासाठी प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. (Sinhastha Kumbhmela Nashik News)

यात घोटी ते जव्हार फाटा, द्वारका सर्कल ते कोल्हार, नाशिक ते कसारा, सावली विहीर शनिशिंगणापूर फाटा ( राहुरी खुर्द), नाशिक ते धुळे, त्र्यंबकेश्वर ते जव्हार – मनोर, सावली विहीर ते मालेगाव, घोटी ते शिर्डी, शनिशिंगणापूर फाटा ते अहिल्यानगर (खरवंडी फाटा) या मार्गांचा समावेश आहे. यात नऊ कामांमध्ये सद्यस्थितीत सुमारे २ हजार ५०० कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत.

आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेवून पायाभूत रस्ते विकासाच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथील मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या व्यापक बैठकीत याबाबत आढावा घेण्यात आला.

यात सिन्नर ते घोटी हे काम जून २६ पर्यंत पूर्ण होईल. काँक्रिट व्हाईट टॉपिंग चारपदरी मार्गासाठी १२५ कोटी रुपये एवढा खर्च होणार आहे. घोटी ते जव्हार फाटा हा ५१.७० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येत आहे. याची किंमत १६०० कोटी रुपये एवढी आहे.

पालघर ते मनोर हा १०६ किमीचा मार्ग प्रस्तावित असून हा सुद्धा कॅबिनेट मंजुरीसाठी जाईल. याची एकूण किंमत १९०० कोटी रुपये एवढी आहे. मुंबई –नाशिक –धुळे यातील ठाणे ते वडपे काम सुरू असून हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. वडपे ते नाशिक व धुळे हा मार्ग बीओटी अंतर्गत आहे. तो सहापदरी करावयाचा असून हे काम कुंभनंतर केले जाईल.

नाशिक ते पेठ रस्ता या चारपदरी मार्गासाठी २२८ कोटी एवढा खर्च येणार आहे. आॅगस्टपर्यंत याला मंजुरी दिली जाणार आहे. चौसाळा- पिंपळगाव बसवंत ते सापुतारा हा २३ किमीचा मार्ग टू लेन पेव्हड शोल्डर असून याला १८० कोटी रुपये खर्च आहे.

नाशिक ते सिन्नर हा बीओटी तत्वावर असून या मार्गाचा सर्विस रोड कुंभपूर्वी पूर्ण होईल. यासाठी ७५ कोटी रुपये निधी आहे. सिन्नर ते नांदुर सिंगोटे हा १८ किमीचा मार्ग असून त्याचे व्हाईट टॅापिंग काम सूरू आहे. कुंभपूर्वी हा मार्ग पूर्ण होणार आहे.

नांदूर सिंगोटे ते कोलार यात शिर्डी विमानतळ ते कोल्हार जोडणारा ४५ किमी लांबीच्या रस्त्याचे टेंडर झाले आहे. हे काम कुंभपूर्वी होईल. सावली विहिर ते कोपरगाव या नऊ किमी रस्त्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून हे काम कुंभपूर्वी पूर्ण होईल.

कोपरगाव – मनमाड ते मालेगाव या ८१ किमी लांबीचा रस्ता बीओटी अंतर्गत सुरू असून तो नॅशनल हायवेकडे सुपुर्द झाल्यानंतर एमओआरटीएच अंतर्गत त्याला चार पदरी अथवा सहापदरी केले जाईल असे केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडून सांगण्यात आले.