नाशिक (Nashik): नाशिक शहरात पहिल्या पावसानंतर सिंहस्थानिमित्त सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची दाणादाण उडाली असून संपूर्ण शहरातील खोदलेल्या रस्त्यांची काय अवस्था होऊ शकते, याची रंगित तालीम दिसली आहे. यामुळे नाशिक महापालिका व कुंभमेळा प्राधिकरण यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले आहे. वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
नोटिसा आणि दंड
नाशिक शहरातील रस्ते व पायाभूत सुविधांच्या कामांना गती देण्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आणि नाशिक महानगरपालिकेने कठोर भूमिका घेत निर्धारित मुदतीत कामे पूर्ण न करणाऱ्या तसेच कामांच्या गुणवत्तेबाबत त्रुटी आढळलेल्या कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस बजावून दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह आणि नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी बैठकीत कुंभमेळ्याशी संबंधित रस्ते कामे, रस्ते पुनर्स्थापना, भूमिगत सेवा वाहिन्यांची कामे तसेच मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी काही कामांची गती अपेक्षेपेक्षा कमी असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
मनुष्यबळ, यंत्रसामग्री वाढवा
कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांनी मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि आवश्यक साधनसामग्रीमध्ये तातडीने वाढ करावी, असे निर्देश देण्यात आले. निर्धारित वेळापत्रक, गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या निकषांकडे दुर्लक्ष केल्यास संबंधितांवरील दंडात्मक कारवाई अधिक कठोर करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला.
अलीकडील प्रत्यक्ष पाहणीदरम्यान निदर्शनास आलेली अपूर्ण कामे, दर्जाबाबतच्या त्रुटी आणि सुरक्षा उपाययोजनांमधील कमतरता यावरही बैठकीत चर्चा झाली. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल आणि कामांचा दर्जा कायम राहील, यासाठी सर्व संबंधित विभागांनी अधिक समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
गुणवत्ता आणि वेळत तडजोड नको
दरम्यान, केवळ कंत्राटदारांवरच नव्हे तर कामांच्या देखरेखीची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. संबंधित अभियंत्यांनी कामांची नियमित पाहणी करून प्रगती सुनिश्चित करावी. नियंत्रण आणि समन्वयात हलगर्जी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावून प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा बैठकीत देण्यात आला.
कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या अनुषंगाने सुरू असलेली पायाभूत सुविधांची कामे अत्यंत महत्त्वाची आहेत. ही कामे केवळ कुंभमेळ्यासाठी नव्हे तर भविष्यातील नाशिकच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे गुणवत्ता आणि वेळ या दोन्ही बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सर्व यंत्रणांनी मिशन मोडवर काम करून प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत. विलंब किंवा हलगर्जी कोणत्याही स्तरावर स्वीकारली जाणार नाही.
अधिकाऱ्यांवरही कारवाई
नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री म्हणाल्या, रस्ते तसेच मान्सूनपूर्व कामांबाबत महानगरपालिकेने शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारले आहे. वेळापत्रक आणि गुणवत्तेचे निकष न पाळणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर कामांच्या देखरेखीत कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित केली जाईल. सर्व विभागांनी युद्धपातळीवर कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पहिल्याच जोरदार पावसाने नाशिक शहरातील रस्त्यांच्या अपूर्ण कामांमुळे नागरिकांचे मोठ्याप्रमाणात हाल झाले असून पाऊस लगेच उघडल्याने काही तासांनंतर परिस्थिती पूर्वपदावर आली. मात्र, आगामी पावसाळ्यात संततधार सुरू राहिल्यास नागरिकांना या खोदलेल्या रस्त्यांचा कसा त्रास सहन करावा लागणार आहे, याची रंगित तालीम यानिमित्ताने झाली आहे. या समस्येतून नाशिक महापालिका व कुंभमेळा प्राधिकरण कसा मार्ग काढतात, यावर पावसाळ्यातील वाहतुकीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.