नाशिक (Nashik): नाशिक जिल्ह्यातील वणी ते गुजरातमधील सापुतारा या १७ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाने घेतला आहे. या १७ किलोमीटर कामासाठी भूसंपादन अधिसूचना प्रसिद्ध केली असून, या रस्त्यासाठी ३ हेक्टर ५७ गुंठे क्षेत्र भूसंपादन करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर नाशिक ते वणी या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याच्या 100 कोटींच्या कामास राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाला यापूर्वी मंजुरी दिलेली असल्याने आता सिंहस्थापूर्वी नाशिक-सापुतारा हा रस्ता होऊन सापुतारा प्रमाणे नाशिकमधील हातगड येथील पर्यटनालाही चालना मिळू शकणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने वणी ते हातगाड या १७ किलोमीटर मार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी भूसंपादन अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेनुसार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने यापूर्वी २०२४ मध्ये भूसंपादन नोटीस देऊन संबंधित जमीन धारकांकडून हरकती मागवल्या होत्या.
वर्षभरात या भूसंपादनास कोणीही हरकती घेतल्या नाही. यामुळे या विभागाने भूसंपादन अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार वणी ते हातगड या १७,किलोमीटरसाठी ३ हेक्टर ५७ गुंठे जमिनीचे संपादन केले जाणार आहे.
नाशिक ते वणी व वणी ते हातगड या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नाशिक ते हातगाड व पुढे सापुतारा हा प्रवास सुलभ व वेगवान होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील हातगड परीसरातही सापुतारा प्रमाणे पर्यटन वृद्धीला मोठी संधी आहे. मात्र, वणी ते हातगाड हा दुहेरी मार्ग असल्याने व घाट2रस्ता असल्याने पर्यटकांचा ओघ कमी आहे. या नवीन मार्गामुळे सापुताराला एक चांगला पर्याय म्हणून हातगाड पुढे येऊ शकतो.
सिंहस्थानिमित्ताने नाशिक व त्र्यंबकेश्वर यांना जोडणाऱ्या विविध रस्त्यांचे मजबुतीकरण, रुंदीकरण करण्याचे नियोजन झाले असून अनेक रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. त्यात केंद्रिय रस्ते परिवहन मंत्रालयाने अनेक रस्त्यांची कामे मंजूर केली आहेत. त्यात घोटी-त्र्यंबकेश्वर या ५० किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी १२०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
तसेच नाशिक पेठ या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण प्रस्तावित केले असून त्याची भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय नाशिक रिंगरोडसाठीही केंद्रिय रस्ते व परिवहन मंत्रालयाने ३१०० कोटी रुपये मंजूर केले आहेत.