

नाशिक (Nashik): साधुग्राम येथील जागेवर प्रस्तावित असलेल्या ‘माईस हब’ अर्थात प्रदर्शनी व संमेलन केंद्र उभारणीसाठी काढण्यात आलेले टेंडर महापालिका प्रशासनाने रद्द केले आहे.
या जागेवरील वृक्षतोडीच्या विरोधात शहरात मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभे राहिल्यानंतर आणि या मुद्द्यावर विविध स्तरांवर चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या घोषणेनंतर महापालिकेने टेंडर रद्द केल्याचे जाहीर केले.
नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तापोवन परिसरात साधुग्राम उभारण्यात येतो. या साधुग्रामसाठी महापालिकेची सुमारे ९० एकर जागा उपलब्ध असून, अतिरिक्त जागा कुंभकाळात भाडेतत्त्वावर घेतली जाते. कुंभमेळा संपल्यानंतर ही जागा मोकळी राहते. मागील दहा वर्षांत या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले असून, ही झाडे सध्या वाढलेली आहेत.
कुंभमेळ्यानंतरही या जागेचा उपयोग व्हावा, या उद्देशाने साधुग्रामच्या सुमारे ३५ एकर जागेवर ‘माईस हब’ उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावानुसार प्रदर्शन हॉल, इनडोअर हॉल, ओपन बँक्वेट आणि तंबूसह विविध सुविधा विकसित करण्याचे नियोजन होते. सिंहस्थ काळात या सुविधांचा साधुग्राम म्हणून वापर आणि उर्वरित काळात प्रदर्शन, संमेलने व परिषदांसाठी वापर अपेक्षित होता.
दरम्यान, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्रामच्या जागेवरील झाडांच्या तोडीसंदर्भात सर्व्हे करण्यात आला आणि नागरिकांकडून हरकती मागवण्यात आल्या. तापोवन परिसरातील सुमारे १,८०० झाडांच्या तोडीच्या प्रस्तावाविरोधात मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदवण्यात आल्या तसेच आंदोलन झाले. या प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने वृक्षतोडीला १५ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली होती.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने माईस हब प्रकल्पासाठी काढलेले टेंडर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. साधुग्रामच्या जागेच्या भविष्यातील वापराबाबत पुढील निर्णय नंतर घेण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या स्तरावर स्पष्ट करण्यात आले आहे.