Girish Mahajan Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Potholes: आठवडाभरात नाशिक खड्डेमुक्त करा; गिरीश महाजनांचा महापालिकेला अल्टिमेटम

नाशिक महापालिकेने खड्ड्यांचे खापर फोडले एमएनजीएलच्या माथ्यावर

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): नाशिक शहरातील खड्डे आठवडाभरात बुजवून नाशिक खड्डेमुक्त करण्याचे निर्देश कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेला दिले आहेत. रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत, याची जबाबदारी महापालिकेचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांची असल्याचे स्पष्ट करत कर्तव्यात कसूर झाल्यास कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. दुसरीकडे, महापालिकेने रस्त्यांच्या दुर्दशेसाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून करण्यात येणाऱ्या कथित अनधिकृत आणि वारंवार खोदकामाकडे बोट दाखविले आहे.

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून राजीव गांधी भवनमध्ये कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महापालिकेने या खड्ड्यांचे खापर थेट महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीवर फोडले. त्यावर मंत्री महाजन यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आठवडाभरात नाशिक खड्डेमुक्त करा. रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत, याची जबाबदारी सर्वस्वी महापालिकेचे अधिकारी व संबंधित ठेकेदारांवर आहे. कर्तव्यात कसूर केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.

नाशिक शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने २८ रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही कामे सुरू करण्यापूर्वी युटीलिटी डक्टसाठी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. या डक्टची कामे पूर्ण झाल्याशिवाय रस्त्यांची कामे सुरू करता येणार नसल्याने शहरातील रस्त्यांची कामे सुरू करण्यास उशीर झाला. त्यातच जुलैमधील संततधार पावसामुळे न खोदलेल्या रस्त्यांवरही प्रचंड खड्डे पडले.

महापालिकेच्या बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी कार्यवाही करण्यापेक्षा बघ्याची भूमिका घेतली. यामुळे मागील सहा महिन्यांपासून शहरातील प्रमुख रस्ते खोदल्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करणा-या नाशिककरांना महिनाभरापासून या खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत आहे.

या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडल्याने नाशिक शहरात या खड्ड्यामुळे पाच बळी गेल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला.याची दखल घेत ज्येष्ठमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक महापालिका आयुक्त व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना खडेबोल सुनावले. त्याचवेळी महापालिकेनेही खड्डे बुजवण्याची मोहिम सुरू केली.

कुंभमेळा मंत्री महाजन यांनीही महापालिकेत बैठक बोलावत खड्ड्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मंत्री महाजन यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत, याची जबाबदारी सर्वस्वी महापालिकेचे अधिकारी व संबंधित ठेकेदारांवर आहे, हे स्पष्ट केले. मी आठवड्यातील तीन दिवस नाशिकमध्येच ठिय्या मांडणार आहे. येत्या आठवडाभरात नाशिक शहर खड्डेमुक्त करण्याची ग्वाही देतो. माती-मुरमाने खड्डे बुजवू नका, फक्त डांबरमिश्रित साहित्यानेच बुजवा आणि अधिका-यांनी स्पॉटवर थांबून काम करून घ्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार ॲड. राहुल ढिकले, महापौर हिमगौरी आडके, स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप यांच्यासह महापालिका, पोलिस आणि इतर शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

‘एमएनजीएल’वर आरोप
गॅस पाइपलाइनसाठी ‘एमएनजीएल’कडून विनापरवाना रस्ते खोदले जात आहेत. महापालिकेने रस्ते दुरुस्ती केल्यावर पुन्हा रस्ते खोदले जातात. दुरुस्ती अडचणीत आली आहे. सिंहस्थ कामांतर्गत सातपूर पपया नर्सरी ते एक्स्लो पॉइंट आणि मखमलाबाद रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट असल्याचे त्यांनी मान्य केले. ठेकेदाराला प्रतिदिन १० लाखांचा दंड केला जात असूनही कामात विलंब होत असल्याचे महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले.

आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी ‘एमएनजीएल’च्या गैरकारभारावर संताप व्यक्त केला. तीन लाखांहून अधिक मिळकतींना कनेक्शन अपेक्षित असताना केवळ ४० हजार कनेक्शन दिले. उर्वरित कनेक्शनसाठी पुन्हा रस्ते खोदणार का? अशा एजन्सींना हाकलून देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. बैठकीला ‘एमएनजीएल’चे अधिकारी उपस्थित नसल्याने मंत्री महाजन यांनीही नाराजी व्यक्त केली. तसेच शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्या अनुपस्थितीवर नाराजी व्यक्त करीत कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश मंत्री महाजन यांनी दिले. 

Key Points

  • गिरीश महाजन यांचे आठवडाभरात नाशिक खड्डेमुक्त करण्याचे निर्देश.

  • खड्ड्यांसाठी महापालिका अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांना जबाबदार धरणार.

  • माती-मुरूमाऐवजी केवळ डांबरमिश्रित साहित्य वापरण्याचे आदेश.

  • सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरातील २८ रस्त्यांची कामे सुरू.

  • रस्त्यांच्या दुर्दशेसाठी महापालिकेकडून MNGLच्या खोदकामाकडे बोट.

  • पपया नर्सरी–एक्स्लो पॉइंट आणि मखमलाबाद रस्त्यांची अवस्था बिकट.

  • संबंधित ठेकेदाराला प्रतिदिन दहा लाख रुपये दंड आकारल्याची आयुक्तांची माहिती.

  • गॅस जोडण्यांच्या संख्येवर आमदार देवयानी फरांदे यांचे प्रश्न.

  • बैठकीला MNGLचे प्रतिनिधी उपस्थित नसल्याने महाजनांची नाराजी.

  • शहर अभियंता संजय अग्रवाल यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश.