Godavari Nashik: गोदावरीच्या दोन्ही काठावरील 100 फूट परिसराच्या स्वच्छतेसाठी अडीच कोटींचे टेंडर

Godavari Nashik
Godavari NashikTendernama
Published on

नाशिक (Nashik) : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी आणि तिच्या उपनद्यांच्या स्वच्छतेला प्राधान्य देत नाशिक महानगरपालिकेने नदीपात्र व नदीकाठ (दोन्ही बाजूंनी १०० फूट) स्वच्छ ठेवण्यासाठी कंत्राटदारांकडून टेंडर मागवले आहे. गोदावरीसह वालदेवी, वाघाडी, कपिला, नंदिनी आणि इतर उपनद्यांच्या दोन्ही तीरांवरील परिसराची साफसफाई, तसेच नदीपात्रात वाढणाऱ्या पाणवेली, पाणगवत, प्लास्टिक आणि इतर कचरा हटविण्याच्या कामासाठी हे टेंडर आहे. या स्वच्छतेसाठी नाशिक महापालिकेचा गोदावरी संवर्धन विभाग ९ महिन्यांसाठी २.४३ कोटी रुपये खर्च करणार आहे.

Godavari Nashik
Exclusive: महाराष्ट्रातील व्हीआयपींच्या सुरक्षेशी खेळ! 'ॲरो' कंपनीवर मेहेरबानी कुणाची? अजित पवारांच्या अपघातानंतरही ‘ॲरो’ला अभय

महापालिकेच्या माहितीनुसार, नदीकाठ आणि नदीपात्रात वाढणाऱ्या पाणवेली व पाणगवतामुळे पाण्याचा प्रवाह अडथळित होण्याबरोबरच प्रदूषणात वाढ होते. त्यातच प्लास्टिक व इतर घनकचरा नदीपात्रात साचल्याने पर्यावरणीय हानी वाढत आहे. त्यामुळे वर्षभर नियमित साफसफाई करण्यावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या कामामुळे नदीकाठ स्वच्छ ठेवण्यासोबतच भाविक, नागरिक आणि पर्यटकांसाठी अधिक स्वच्छ वातावरण निर्माण करण्याचा उद्देश आहे. पुढील वर्षी नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होत असून या काळात गोदावरी स्वच्छतेला अधिक महत्व देण्यात आले असून त्यासाठी गोदावरीत मिसळणारे सांडपाणी कायमचे बंद करणे, मलनिस्सारण प्रकल्पांमधून १० बीओडीचे पाणी गोदापात्रात टाकणे, गोदावरीला मिळणा-या सर्व उपनद्यांमध्ये मिसळणारे सांडपाणी बंदिस्त करणे आदी उपाययोजनांची कामे सुरू असतानाच आता महापालिकेच्या गोदावरी संवर्धन विभागाने गोदावरीच्या पात्रातील पाणवेली, पाणगवत काढणे तसेच दोन्ही काठांच्या १०० फूट परिसरात स्वच्छता ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिकेने शहरातील गोदावरी व तिच्या उपनद्यांच्या स्वच्छतेसाठी २.४३ कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे.

Godavari Nashik
Nashik: सिंहस्थाची विकासकामे फेब्रुवारीतच पूर्ण होणार! महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी काय सांगितले?

या टेंडरनुसार संबंधित मक्तेदाराला २७३ दिवस म्हणजे ९ महिने नदी स्वच्छतेचे काम करणे बंधनकारक असून त्यासाठी किमान ८० अकुशल कर्मचारी नेमावे लागणार आहे. या टेंडरनुसार संबंधित मक्तेदाराला नदी व नदीकाठ स्वच्छतेसाठी आवश्यक  ते साहित्य स्वता उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. गोळा केलेला कचरा, पाणवेली, पाणगवत यांची योग्यठिकाणी साठवण करून ते घंटागाडीत टाकण्याची जबाबदारीही संबंधित मक्तेदाराची जाणार आहे.

असे नेमणार कर्मचारी
नाशिक महापालिका क्षेत्रात गोदावरीची लांबी २०.५ किलोमीटर असून या भागात गोदावरी स्वच्छतेसाठी ३५ कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत.  वालदेवी नदीची लांबी १४.६० किलोमीटर असून वालदेवीच्या स्वच्छतेसाठी ६ कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. नंदिनी नदीची लांबी १४ किलोमीटर असून ती पूर्णपणे नागरी भागातून असल्यामुळे या भागात १५ कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत.  

वरुणा (वाघाडी) नदीची लांबी १४.३० किलोमीटर असून तेथे ८ कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. कपिला नदीची लांबी ४ किलोमीटर असून तेथे ८ कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. इतर उपनद्यांवर १० कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत.

Tendernama
www.tendernama.com