नाशिक (Nashik): महापालिकेमार्फत केल्या जाणा-या पाणीपुरवठ्याच्या महसुलात दरवर्षी जवळपास २७ कोटींची तूट येत असते. ही तूट भरून काढण्यासाठी महापालिकेने स्वयंचलित जलमापक बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासनाच्या माध्यमातून जागतिक बँकेकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर सरसकट संपूर्ण शहरात स्वयंचलित मीटर रिडर (एएमआर) बसवले जाणार आहेत. या नव्या प्रणालीमुळे महापालिकेची २५० कोटींची थकित पाणीपट्टी वसुलीला फायदा होऊ शकणार आहे.
नाशिक महापालिका मुख्यालयात जागतिक बँकेच्या प्रतिनिधींची गुरुवारी (ता. ११) पाणी पुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांच्या समवेत बैठक झाली. त्यात स्वयंचलित जलमापक (ऑटोमॅटिक मीटर रीडर) संदर्भात चर्चा करण्यात आली. पाणीपुरवठा यंत्रणेवर होणारा खर्च आणि पाणीपट्टीतून येणारा महसूल यात मोठी तफावत असल्याने महापालिकेला दरवर्षी अंदाजे २७ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
यामागे मोठ्या प्रमाणावर होणारा हिशेबबाह्य पाणीवापर आणि वाढती थकबाकी हे प्रमुख कारण ठरत आहे. महापालिकेने नऊ वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात शहरातील सुमारे ४४ टक्के पाणीवापर नोंदीबाहेर असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतरही अनधिकृत नळ जोडण्या आणि अनधिकृत वापरावर नियंत्रण मिळवता आले नाही.
दुसरीकडे, पाणीपट्टीची बिले वाटप करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने थकबाकीचा आकडा २५० कोटींच्या घरापर्यंत पोहोचला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेने पाणीपुरवठा व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पाणीपट्टीची बिले नियमितपणे वाटप करण्यासोबतच अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचबरोबर पाण्याच्या वापराचे अचूक मोजमाप व्हावे आणि वापरलेल्या पाण्याचा महसूल प्रत्यक्षात प्राप्त व्हावा, यासाठी शहरात टप्प्याटप्प्याने स्वयंचलित मीटर बसवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
असे आहे स्वयंचलित जलमापक
स्वयंचलित जलमापक रीडिंग प्रणाली, हा एक स्मार्ट पर्याय आहे. मानवी हस्तक्षेपाशिवाय वापराची नोंद घेऊन ती थेट संबंधित कंपनीकडे पाठविणार आहे. या स्वयंचलित जलमापकात एक कम्युनिकेशन मॉड्यूल बसवले असते. हे मॉड्यूल रेडिओ फ्रिक्वेन्सी, जीएसएम व जीपीआरएस किंवा पॉवर लाइन कम्युनिकेशनच्या मदतीने मीटरचे रीडिंग दररोज, आठवड्याला किंवा महिन्याला आपोआप सर्व्हरला पाठवते. त्यामुळे घरोघरी जाऊन पाणी वापराच्या नोंदी घ्याव्या लागत नाहीत.
शहरात नळजोडणीची स्थिती
नळ जोडणी संख्या- २,४०,१७०
सुस्थितीत आढळलेले पाणीमीटर- ७४,४६३
रिडींग दिसत नसलेले पाणीमीटर- २१,४५७
नियमबाह्यरित्या जमिनीखालील पाणीमीटर- २०,५४६
बंदस्थितीतील पाणीमीटर- २०,१५४
पाणीमीटर नसलेल्या नळजोडणी- १५,९६७
फोटो घेता येत नसलेले १९,५२६
घर बंदस्थितीत आढळलेले- १८,५७८
अवजड चेंबरखाली असलेले पाणीमीटर- ४,१२३
नळ जोडणी खंडित असलेले- २,२०७
पाणीमीटर चोरीला गेलेले- १,४३७
रिव्हाईज जलमापक- ३६७
तात्पुरते बंद स्थितीत- २,१६५
कोणताही प्रतिसाद नसलेल्या नळजोडण्या- ३७,०००