Nashik Municipal Corporation
Nashik Municipal Corporation Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : पेस्टकंट्रोलच्या दोन ठेक्यांसाठी प्रत्येकी एक कंपनी पात्र

Sachin

नाशिक (Nashik) : मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या महापालिकेच्या ३४ कोटींच्या पेस्ट कंट्रोल ठेक्याचे टेंडर मंगळवारी (दि. ७) उघडण्यात आले. मागील तीन टेंडर रद्द करण्यात आल्यामुळे या चौथ्या टेंडरमध्ये दोन विभागांसाठी सहभाग घेतलेल्या प्रत्येकी तीन कंपन्यांपैकी दोन-दोन कंपन्या कागपदपत्र तपासणीत अपात्र ठरल्या असून विभाग एकमधील ठेक्यासाठी दिग्विजय एन्टरप्रायजेस व विभाग दोनसाठी एसआर पेस्ट कंट्रोल लिमिटेड या कंपन्या पात्र ठरल्या आहेत.

महापालिकेच्या मलेरिया विभागातर्फे राबवलेल्या या टेंडर प्रक्रियेतील हे चौथे टेंडर असल्याने प्रत्येकी एक कंपनी पात्र ठरूनही आता वित्तीय लिफाफा उघडला जाणार आहे. त्यानंतर तडजोडीनंतर टेंडरप्रक्रियेतील अटीशर्ती मान्य करणाऱ्या कंपनीला कार्यारंभ आदेश दिले जातील.

महापालिकेतर्फे शहरात धूर व औषध फवारणी, पेस्ट कंट्रोलसाठी ठेका दिला जातो. या ठेक्याभोवती गेल्या साडेतीन वर्षांपासून पालिकेचे राजकारण रंगले आहे. मे. दिग्विजय एंटरप्रायजेस या ठेकेदाराची मुदत ऑगस्ट २०१९ मध्येच संपुष्टात आली. त्यानंतर सप्टेंबर २०१९ मध्ये पेस्ट कंट्रोल ठेक्याचा प्रस्ताव तयार करताना विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून १८ कोटींचा ठेका ४६ कोटींवर पोहोचवण्यात आला. त्यामुळे तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी ही निविदा प्रक्रियाच रद्द करीत रिटेंडर काढले.

मे. दिग्विजय एंटरप्रायजेस या ठेकेदाराने २७ ऑक्टोबर २०२२ रोजी त्यास उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यानंतर तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यात अनावश्यक खर्चात कपात करून हा ठेका ४६ कोटींवरून ३४ कोटी रुपयांवर आणत सुधारित विभागवार टेंडर प्रसिद्ध केले. या टेंडरला सलग तीनवेळा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे सहा महिन्यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या चौथ्या टेंडरबाबत उत्सुकता होतीं. मलेरिया विभागाने मागील आठवड्यात टेंडरची फाईल आयुक्तांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवली.

दोन्ही विभागांतील टेंडरचे तांत्रिक लिफाफे मंगळवारी उघडण्यात आल्यानंतर प्रत्येकी तीन कंपन्यांपैकी प्रत्येकी दोन कंपन्यांचे कागदपत्र अपुरे असल्यामुळे त्या अपात्र ठरवण्यात आले असून विभाग एकसाठी दिग्विजय एन्टरप्रायजेस व विभाग दोनसाठी एसआर पेस्ट कंट्रोल लिमिटेड या कंपन्या पात्र ठरल्या आहेत. या पात्र कंपन्यांचे वित्तीय लिफाफे उघडण्यासाठी ऑडीट विभागाकडे जाणार असून या ठेक्यावर अंतिम निर्णय महापालिका आयुक्तच घेणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून पेस्ट कंट्रोल ठेकयाची प्रक्रिया राबवले जात आहे. मध्यंतरी महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे टेंडर उघडण्यात आले नव्हते, असे मलेरिया विभागाचे म्हणणे आहे.

आचारसंहिता शिथील झाल्यानंतर टेंडरचे तांत्रिक लिफाफे उघडण्यात आले. महापालिकेत २०१६ पासून दिग्विजय याच कंपनीकडे पेस्ट कंट्रोलचे काम होते. मात्र आता ही प्रक्रिया यशस्वी झाल्यास पेस्ट कंट्रोलचे काम दोन कंपन्यांकडे सोपवले जाणार आहे. विभाग एकमध्ये नाशिकरोड, पंचवटी व पूर्व विभाग तर दुसऱ्या गटात सातपूर, सिडको, पश्चिम या भागांचा समावेश आहे. शासनाच्या नियमानुसार या निवीदेतील कागदोपत्रांची तपासणी करण्यात आली. शासनाने घालून दिलेल्या अटीशर्तीं बरोबरच शासनाचे सर्व निकष पाहूनच यावर काम करण्यात आले. दरम्यान याप्रकरणी अंतिम निर्णय आयुक्त हेच घेणार आहे, असे मलेरिया विभागातर्फे सांगण्यात आले.