नाशिक (Nashik) : येथे २०२७ मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेने तपोवनातील साधुग्राममध्ये ५४ एकरवरील सुमारे १७०० झाडे तोडण्यासाठी हरकती मागवल्या होत्या.
तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीला शहरातील जागरूक नागरिक, संस्था यांनी विरोध दर्शवला असून महापालिकेच्या उद्यान विभागाकडे १०० हरकती प्राप्त झाल्या आहेत. महापालिका उद्यान विभाग या हरकतींवर शुक्रवारी (ता. २१) सुनावणी घेणार आहे.
सिंहस्थात पंचवटीतील तपोवनामध्ये साधुग्राम उभारले जाते. मागील सिंहस्थात म्हणजे २०१५ मध्ये तपोवनामध्ये सरकारी ५४ एकर जागेसह परिसरातील शेतजमिनी तात्पुरत्या घेऊन तेथे साधुग्राम उभारले होते. या साधुग्राममध्ये आखाडे व साधू-महंतांना तंबू उभारण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या साधुग्राममध्ये रस्ते करण्याबरोबरच पथदीप, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहाची व्यवस्था केली होती.
आताही त्याच धर्तीवर साधुग्राममध्ये तंबू, रस्ते सुविधासह इतर मूलभूत सुविधा प्रशासनाला उभारायच्या आहेत. मागील बारा वर्षांत महापालिकेची जागा असलेल्या ५४ एकरवरील क्षेत्रात मोठ्या संख्येने झाडे वाढली आहेत. यामध्ये सर्वाधिक काटेरी बाभळी आहेत. यामुळे नाशिक महापालिकेच्या उद्यान विभागाने या ५४ एकर जागेतील वृक्षांची गणना केली. त्यात सर्वप्रकारची साधारण १७०० झाडे असल्याचे आढळून आले आहे.
महापालिकेच्या उद्यान विभागाने यासंदर्भात नोटीस प्रसिद्ध करून नागरिकांकडून हरकती मागवल्या होत्या. तत्पूर्वी महापालिकेच्या उद्यान विभागाने जी झाडे तोडली जाणार त्यांना पिवळ्या रंगांनी फुल्या मारल्या आहेत. पालिकेने साधुग्रामच्या विकासासाठी जनार्दन मंदिरापर्यंतच्या परिसरातील वृक्षांची स्वामी आश्रम ते बटूक हनुमान मोजणी केली.
दरम्यान तपोवन परिसरातील हिरवाईची दाट रचना, चिंच, जांभूळ, कडुनिंब यासारख्या भारतीय प्रजातींची उपस्थिती आणि अनेक प्रौढ वृक्षांची हेरिटेज वृक्ष म्हणून नोंद होण्याची शक्यता अनेक नागरिक व संस्थांनी अधोरेखित केली आहे. तपोवनचा पर्यावरणीय समतोल, सांस्कृतिक वारसा आणि नाशिकच्या दीर्घकालीन सार्वजनिक हिताच्या दृष्टीने या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करावा, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
दरम्यान तपोवनात एकही मोठे झाड तोडले जाणार नाही. जेथे साधू-महंतांसाठी सुविधा पुरवल्या जाणार आहेत, तेथीलच झाडे तोडली जातील. यामध्ये विशेषतः काटेरी झाडे आहेत, तर आवश्यकता वाटल्यास काही झाडांच्या फांद्या छाटल्या जातील, असे महापालिक उद्यान विभागाचे म्हणणे आहे. दरम्यान येत्या शुक्रवारी (दि. २१) या हरकतींवर सुनावणी होऊन त्यानंतर वृक्षतोडीचा निर्णय घेतला जाणार आहे.