

नाशिक (Nashik) : नाशिक महानगरपालिकेने शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या दीर्घकाळापासून प्रलंबित समस्येवर तोडगा काढण्यासाठी रविवार करंजा परिसरातील जुन्या यशवंत मंडई शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या जागेवर आता बहुमजली वाहनतळ उभारला जाणार आहे.
आगामी कुंभमेळ्यादरम्यान येणाऱ्या लाखो भाविकांच्या वाहनांसाठी उपयोगात आणण्याच्या दृष्टीने या बहुमजली वाहनतळाची रचना करण्यात आली आहे. यापूर्वी या जागेवर व्यावसायिक संकुल (कॉमर्शिअल कॉम्प्लेक्स) उभारण्याचा प्रस्ताव होता, मात्र, शहरातील बदलत्या गरजा आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने हा प्रस्ताव रद्द करून वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला. या बहुमजली वाहनतळामुळे शहराच्या मध्यभागी पार्किंगची अडचण दूर होण्यास मदत होईल.
नाशिक शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या रविवार कारंजा परिसरात वाहनांची होणारी कोंडी आणि वाहने उभी करण्यासाठी जागा नसणे, यामुळे या मध्यवर्ती भागातील बाजारपेठेचे महत्व कमी होत चालले आहे. यामुळे या भागात वाहनतळ असावा, अशी अनेक वर्षांची मागणी होती.
महापालिकेकडच वाहनतळासाठी राखीव जागा नसल्याने या समस्येतून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर महापालिकेने रविवार कारंजावरील यशवंत मंडई या जीर्ण झालेल्या ईमारतीच्या जागेवर बहुमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी यशवंत मंडईची इमारत पाडण्यात आली.
आता या रिकाम्या झालेल्या भूखंडावर बहुमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा बहुमजली वाहनतळ सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट अँड ट्रान्स्फर (डीबीएफओटी) पद्धतीने राबवला राबवला जाणार आहे. महापालिकेने यासाठी प्रस्ताव मागवणारे टेंडर प्रसिद्ध केले असून या टेंडरमध्ये सहभागी होण्याची मुदर ४ डिसेंबर असून तांत्रिक लिफाफा ५ डिसेंबर रोजी उघडला जाणार आहे.
या टेंडरनुसार निवड झालेल्या खासगी संस्थेबरोबर वाहनतळ चालवण्यासाठी ३० वर्षांचा करार केला जाणार आहे. करार संपल्यानंतर संपूर्ण सुविधा महानगरपालिकेकडे परत हस्तांतरित केली जाईल. हे बहुमजली वाहनतळ उभारण्यासाठी साधारणता ३० कोटी रुपये खर्च येईल, असे गृहित धरण्यात आले आहे.
शहरातील सर्वात गर्दीच्या भागात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा महानगरपालिकेचा पहिला बहुमजली वाहनतळ प्रकल्प असेल. रविवार करंजा हा प्रमुख बाजारपेठ असून, मुख्य रस्ता, एमजी रोड, शालीमार, कपड बाजार आणि सराफ बाजार यांसारख्या परिसरांना वेढलेला आहे. या भागात नेहमीच प्रचंड गर्दी असते. त्यामुळे वाहनतळाची गरज भासते.
महानगरपालिकेने शहरातील वाहनतळ समस्या सोडवण्यासाठी सहा विभागांपैकी पाच विभागांत असे बहुमजली वाहनतळ उभारण्याची योजना आखली आहे. यापूर्वी नाशिक महानगर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएमएससीडीसीएल) पंचवटीतील सीता गुंफा जवळ आणि यशवंत मंडई येथे यांत्रिक वाहनतळ प्रकल्प प्रस्तावित केले होते.
हे प्रकल्पही सार्वजनिक-खासगी भागीदारीवर आधारित होते. मात्र, त्यांच्या टेंडरला प्रतिसाद न मिळाल्याने प्रकल्प रखडला आणि अखेर रद्द करण्यात आला.