नाशिक (Nashik): नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाने पायाभूत प्रकल्पांसंबंधीची कामे मार्गी लावल्यानंतर आता भाविकांना इतर सुविधा पुरवण्याते प्रकल्प हाती घेतले आहेत. भाविकांना सुविधा देणा-या प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने टेंड सिटीचा समावेश आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या आजुबाजूला साधारण चार टेंट सिटी उभारण्यात येणार आहेत.
राज्याच्या पर्यटन विभागाने तयार केलेल्या आराखड्यातील टेंटसिटी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणचे आयुक्त शेखर सिंह यांनी टेंटसिटीच्या भागधारकांसोबत चर्चा करून त्यांच्याकडून काही कल्पना जाणून घेतल्या. या टेंटसिटीमध्ये भाविकांना दिल्या जाणा-या सुविधा व गर्दीकाळातील समन्वय या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यावर त्यांनी भर दिला.
नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, एनटीकेएमए सहायक आयुक्त सौरीश सहाय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) नाशिकचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, पर्यटन विभागाचे उपसंचालक डॉ. नंदकुमार राऊत, एनटीकेएमए तहसीलदार योगेश चंद्रे, मकरंद दिवाकर आदींनी यावेळी चर्चासत्रात सहभाग घेतला. पर्यटन विभागाने केलेल्या आराखड्यानुसार सिंहस्थ कुंभमेळा काळात गुजरातमधील सापुतारा, पालघर जिल्ह्यातील जव्हार- मोखाडा, समृद्धी महामार्गालगत टेंट सिटी उभारण्यात येणार आहे.
नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना या टेंटसिटीमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नाशिकजवळील टेन्ट सिटीसाठी त्र्यंबकरोडवरील खादी ग्रामोद्योग व दिंडोरीरोडवरील जलसंपदा (मेरी) विभागाची जमीन निश्चित करण्यात आली आहे.
या टेन्ट सिटीच्या ठिकाणी प्रदर्शन केंद्र उभारले जाणार आहेत. याशिवाय कुंभमेळ्यासाठी वेगवेगळ्या भागातून येणा-या भाविकांसाठी त्र्यंबकेश्वरजवळ पर्यटनक्लस्टर विकसित केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यकता भासल्यास वन विभागाचे सहकार्य घेतले जाणार आहे.
नाशिक शहराजवळ सिंहस्थ काळात कलाकुंभ उभारला जाणार असून या कलाकुंभमध्ये स्थानिक कारागीर, स्वयं-साहाय्य गट आणि हस्तकला व्यावसायिकांसाठी दुकाने उपलब्ध करून देता येतील. त्यात राज्य मंडप, कुंभ संग्रहालय, नदी मंडप, एक जिल्हा एक उत्पादनाची दुकाने, खुले थिएटर, कला प्रदर्शन असणार आहे. या बाबींचा विचार करून सिंहस्थाच्या कालावधीत उभारल्या जाणाऱ्या टेंट सिटींचे नियोजन, नियमन व संचालन याबाबत व्यापक पातळीवर चर्चा करण्यात आली.
टेंट सिटी विकासासाठी प्राधिकरणाच्या नेतृत्वाखाली एकसंध व शिस्तबद्ध कार्यपद्धती राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या. या टेंटसिटीमध्ये भाविकांच्या सुरक्षिततेसह दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आवश्यक नागरी सुविधा, स्वच्छता, वाजवी दर, सुरक्षितता मानके निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
त्याचप्रमाणे पर्वणीकाळातील वाहतूक व गर्दी व्यवस्थापन आराखड्याशी टेंट सिटींचा समन्वय घडवण्यावरही भर देण्यात आला. यावेळी टेंट सिटी सुविधांमध्ये एकसमानता राखणे, भागधारकांची पारदर्शक पद्धतीने निवड करणे, अधिकृत टेंट सिटींबाबतची खात्रीशीर माहिती भाविकांपर्यंत अधिकृत माध्यमांतून पोहोचवणे, या मुद्द्यांवर चर्चा झाली.