Nashik City, nmc, Kumbh Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: गंगापूर रोडला समांतर रस्त्याला अखेर कुंभमेळा प्राधिकरणची मान्यता; डाव्या कालव्यावरील रस्तावर फुली

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या गंगापूर रोडवरील ताण कमी करण्यासाठी आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी गंगापूररोडला समांतर रस्ता करण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावास अखेर कुंभमेळा प्राधिकरणाने मान्यता दिली आहे.

महापौर हिमगौरी आडके यांनी मागील आठवड्यात महासभेत गंगापूर रोडला समांतर असलेल्या रस्त्याचा समावेश सिंहस्थ कुंभमेळा विकास आराखड्यात केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यानंतर कुंभमेळा प्राधिकरणनेही या समांतर रस्त्याला मान्यता दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

दरम्यान गंगापूर डाव्या कालव्यावरून नवीन रस्त्याचा कुंभमेळा आराखड्यात समावेश करण्याच्या प्रस्तावास कुंभमेळा प्राधिकरणने नकार दिला असल्याचे समजते. गंगापूररोड हा नाशिक शहरातील प्रमुख रस्ता असून तो सध्या अपुरा पडत असल्याने त्याच्यावरील भार कमी होण्यासाठी त्याला समांतर गोदावरीच्या उजव्या बाजूने रस्ता व्हावा, अशी मागणी जवळपास वर्षभरापासून होत आहे.

माजी मंत्री माणिकराव कोकोटे यांच्या मागणीला यश न आल्यानंतर महापौर हिमगौरी आडके यांनीही काही दिवसांपूर्वी गंगापूररोडला समांतर रस्ता होण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, त्या मागणीलाही काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांनीही रस्त्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, कुंभमेळा प्राधिकरणकडून प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यानंतर नाशिक महापालिकेने त्या रस्त्याचा नाद सोडून गंगापूररोडला समांतर रस्ता म्हणून भोसला महाविद्यालय ते कबीर नगर झोपडपट्टीमार्गे बारदान फाटा या नव्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा ६६ कोटींचा प्रस्ताव तयार केला.

महापालिकेने नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण समितीकडे हा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवला. कुंभमेळा प्राधिकरणने त्या प्रस्तावास मान्यता दिला आहे. सिंहस्थासाठी रस्त्यांची कामे मंजूर करताना गंगापूर रोडचा स्वतंत्र विचार झाला नव्हता. बारदान फाटा ते अशोक स्तंभ या गंगापूर रोडवर भूसंपादनाचा प्रश्न प्रलंबित असल्याने पर्यायी मार्ग म्हणून हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. प्रस्तावानुसार, सध्या ९ मीटर रुंद असलेल्या या रस्त्याचे एकूण १५ मीटरपर्यंत रुंदीकरण केले जाणार आहे. म्हणजेच अतिरिक्त ६ मीटरचा रस्ता विकसित होणार आहे. कबीर नगर झोपडपट्टीमुळे येणारा अडथळा लक्षात घेऊन त्या भागात तात्पुरत्या स्वरूपात १२ मीटर रुंदीकरण केले जाणार असून, उर्वरित रस्ता १५ मीटर रुंदीचा होणार आहे.

या समांतर रस्त्यामुळे गंगापूररोडवर महात्मा नगर आणि कॉलेज रोडकडून येणाऱ्या वाहतुकीवरील ताण लक्षणीयरीत्या कमी होईल. सध्या आनंदवली आणि पाइपलाइन रोड भागात मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहत वाढली आहे. अरुंद रस्त्यांमुळे या भागातील वाहतूक ठप्प होते आणि हीच वाहतूक पुढे आनंदवली मार्गे गंगापूर रोडला मिळते. यातून कोंडी वाढते. प्रस्तावित भोसला महाविद्यालय ते बारदान फाटा रस्ता विकसित झाल्यास हा पर्यायी मार्ग वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

डावा कालवा रस्त्यावर फुली
महापालिकेने गंगापरूरोडला समांतर रस्ता उभारण्याच्या प्रस्तावाबरोबरच विस्डम हायस्कूलच्या बाजूने असलेला गंगापूर डावा कालव्याच्या काठाने रस्ता विकसित करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा रस्ता जवळपास ८ ते ९ मीटर रुंद आणि ९ किलोमीटर लांबीचा असणार आहे.

हा रस्ता थेट मखमलाबाद लिंक रोडला जोडला जाणार आहे. त्यामुळे आनंदवली, गंगापूरगाव, दसक, मखमलाबाद या भागातील नागरिकांना थेट पेठ रोड आणि त्र्यंबक रोडकडे जाण्यासाठी नवीन पर्याय उपलब्ध होणार असल्याचे नमूद केले होते. मात्र, कुंभमेळा प्राधिकरणने या डाव्या कालव्याच्या काठावरील नवीन रस्त्याचा प्रस्ताव नाकारला असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले. यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निधीतून तो रस्ता साकारण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नांना अपयश आले असून आता त्यासाठी इतर निधीचा शोध घ्यावा लागणार आहे.