Road work, contractor, workers Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याला महिनाभरातच भेगा... प्रवीण गेडाम अ‍ॅक्शन मोडवर

प्रत्यक्ष जागेवर जाऊन केली सिंहस्थ रस्ता कामाची गुणवत्ता तपासणी

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून जवळपास २५ हजार कोटींच्या कामांची घोषणा केली असून त्यातील बहुतांश कामे टेंडर प्रक्रियेत, तर काही कामे सुरू झाली आहेत. आता कामे करण्यासाठी थोडासाच अवधी उरलेला असल्याने त्या कामांच्या गुणवत्तेबाबत सहज प्रश्न उपस्थित केला जातो.

या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी इगतपुरी तालुक्यातील एका रस्ता कामाच्या जागेवर जाऊन तेथील मुरूम, वाळू, सिमेंट आदी कामाचे नमूने उचलत त्यांची गुणवत्ता तपासणी व्हॅन मध्ये तपासणी केली. तसेच या तपासणीचा अहवाल तातडीने सादर करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागास सूचना दिल्या. यामुळे कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण करताना त्यांच्या गुणवत्तेवरही लक्ष असल्याचा संदेश त्यांनी सर्व कार्यान्वयीन यंत्रणांना दिला आहे.

नाशिक जिल्ह्यात कुंभमेळ्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात येत असून या कामांना गती देण्यासाठी आणि कामांचे संनियंत्रण करण्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. गेडाम यांनी सर्व यंत्रणांना कामांच्या गुणवत्तेबाबत विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर वाडीवऱ्हे येथे बेलगाव कु-हे-नांदुरवैद्य-साकुरफाटा मार्गाची पाहणी केली. या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू असून त्या रस्त्याला महिनाभरात भेगा पडल्याच्या तक्रारी झाल्या. यामुळे डॉ. गेडाम यांनी या रस्तेकामाची पाहणी केली. त्यांचेसमवेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे होते.

डॉ. गेडाम यांनी रस्त्यासाठी वापरण्यात येत असलेल्या खडी, मुरुम व इतर साहित्याची पाहणी केली आणि त्यांचे नमुने घेतले. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच संबंधित कंत्राटदार यांचे अभियंते यांचे समक्ष काही साहित्याची मटेरियल टेस्टिंग व्हॅनमार्फत तपासणीही केली. तसेच या तपासणीचे अहवाल तातडीने मागविण्याच्या सुचना सर्व संबंधित यंत्रणेला दिल्यात. या नमुन्यासह त्यांनी नमुने परिक्षण प्रयोगशाळेलाही भेट देऊन माहिती घेतली.

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त विविध विभागांमार्फत करण्यात येत असलेल्या रस्ते, पुल, घाट व इतर कोणत्याही कामात नियमानुसार आवश्यक तो दर्जा आढळून येणे आवश्यक असल्याचेत्यांनी यापूर्वी वारंवार सांगितले आहे. त्यानंतरही कामांच्या दर्जाबाबत तक्रारी आल्याने डॉ. गेडाम यांनी जागेवर जाऊन पाहणी करीत संबंधित यंत्रणेला योग्य तो संदेश दिला आहे. 

सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या माध्यमातून आतापर्यंतहजारो कोटी रुपयांच्या विकास कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यात जिल्ह्यातील रस्ते कामांचाही मोठा समावेश आहे. भाविकांचा प्रवास सुखकर होण्यासााठी रस्त्यांची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झालीच पाहिजेत याकरीता या कामांचे संबंधित विभागामार्फत दैनंदिन पर्यवेक्षण करणे आवश्यक असून कामाच्या टप्प्यानुसार होत असलेल्या कामांचे छायाचित्र करण्याच्याही सुचना यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.