नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्यात यावेळी भाविकांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढणार हे गृहित धरून कुंभमेळा विकास प्राधिकरणने तपोवन येथे घाट प्रस्तावित केला आहे. या घाटाच्या ठिकाणी पुरेसे पाणी उपलब्ध असावे म्हणून आता त्या घाटाच्या खालच्या भागात गोदावरी-नंदिनी संगम परिसरात बलून बंधारा उभारण्यात येणार आहे.
या बलून बंधाऱ्यामुळे लक्ष्मीनारायण घाट येथे भाविकांना स्नानासाठी पुरेसे पाणी उपलब्ध राहू शकणार आहे. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या सूचनेनुसार जलसंपदा विभागाने हा बलून बंधारा प्रस्तावित केला आहे.
नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. प्रयागराज येथील कुंभमेळ्याला लाभलेला प्रतिसाद लक्षात घेऊन नाशिक कुंभमेळा विकास प्राधिकरणकडून पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. नाशिकच्या सिंहस्थ पर्वणीला भाविकांची वाढीव संख्या गृहित धरून पंचवटीत गोदावरीवर घाटांची संख्या वाढवण्यात येणार आहे.
मागील सिंहस्थात नाशिकला गोदावरीवर रामकुंड ते गाडगेमहाराज पूल तेथून अमरधामपर्यंत तसेत स्मार्टसिटी योजनेतून घाट बांधलेले आहेत. प्रयागराज कुंभमेळ्याला मिळालेला उदंड प्रतिसाद बघता नाशिकच्या सिंहस्थातही भाविकांची संख्या वाढू शकते हे गृहित धरून कुंभमेळा प्राधिकरणने नाशिकला गोदावरीवर नवीन चार घाट बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लक्ष्मीनारायण घाट, गंगापूर धबधबा घाट, नवशा गणपती घाट उभारले जाणार आहे.
लक्ष्मीनारायण घाट येथे गोदावरीला उतार असल्याने तेथे भाविकांना स्नानासाठी संथ पाणी उपलब्ध होणार नाही, ही बाब लक्षात आल्याने कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी जलसंपदा विभागाला येथे बलून बंधारा उभारण्याबाबत चाचपनी करण्यास सांगितले होते. तसेच त्यांनी बलून बंधारा उभारण्याबाबत देश विदेशातील या क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा करून त्यांच्याकडून याबाबत मार्गदर्शन घेतले.
तज्ज्ञांनी केलेल्या शिफारशीनुसार त्यांनी जलसंपदा विभागाला या बलून बंधाऱ्याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बंधाऱ्यासाठी नदीपात्रात बांधकाम करून पाणी अडवले जात नाही.
हा बंधारा म्हणजे एक रबर किंवा फायबर-रबर मिश्रित कापडाचा मोठा फुगा (बलून) असतो, जो नदी पात्रात आडवा टाकला जातो. हवा व पाण्याने तो फुगवल्यामुळे त्याला डोम चा आकार येतो व पाण्याचा साठा होतो. पाणी जास्त झाले की किंवा पूर येण्याची भीती असेल तर त्यातील हवा किंवा पाणी काढून बंधारा सपाट केला जातो. यामुळे पाणी वाहून जाते. हा पारंपरिक काँक्रीट अथवा दगडी बंधाऱ्यापेक्षा स्वस्त व जलद बांधता येणारा आणि पर्यावरणाला कमी हानी पोहोचवणारा आहे.
हा बलून बंधारा फुगवल्यावर गरजेनुसार १० मीटरपर्यंत उंच होऊ शकतो. हा लांबट फुगा नदीच्या तळाशी काँक्रीट ब्लॉकने घट्ट बसवलेला असतो. गोदावरीवर तपोवनाच्या पलीकडे हा बलून बंधारा उभारल्यामुळे प्रस्तावित लक्ष्मीनारायण घाटावर पाण्याची पातळी निश्चित करता येईल व भाविकांची सुरक्षितताही सांभाळता येणार आहे.
कुंभमेळा विकास प्राधिकरणच्या सूचनेनुसार नाशिक जलसंपदा विभागाने सुरक्षित आणि स्नानासाठीपुरेसे पाणी या बाबी लक्षात घेऊन बलून बंधारा प्रस्तावित केला आहे. या बलून बंधाऱ्यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा आणणार नाही. हा बंधारा केवळ पाण्याची पातळी वाढवण्याचे काम करणार आहे. यामुळे गोदावरी पाणी वाटपाच्या लवादाच्या मार्गदर्शक नियमांचा भंग होणार नाही. तसेच हा बंधारा केवळ पर्वणी काळातच सक्रिय राहणार आहे.