नाशिक (Nashik): नाफेडच्या कांदा खरेदीसाठी सहकारी संस्थांना खरेदीकेंद्र मंजूर करण्यासाठी राबवलेल्या टेंडर प्रक्रियेतील जवळपास ११ संस्थांची कागदपत्रे अपूर्ण असूनही त्यांचे टेंडर मंजूर करण्यात आले आहेत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने या संस्थांच्या कागदपत्रांमधील त्रुटी दर्शवणारा अहवाल देऊनही नाफेडने त्याच संस्थांना कांदा खरेदीचे कंत्राट दिले आहे. यामुळे नाफेडने कांदा खरेदी केंद्र चालवण्यास देण्यासाठी टेंडर प्रसिद्ध करण्याचा केवळ देखावा केल्याचे कागदपत्रांवरून समोर आले आहे.
या संस्थांनी सादर केलेल्या कागदपत्रांमधील त्रुटी उघडकीस आल्यानंतर नाफेडने त्याचे खापर जिल्हा उपनिंबधक कार्यालयावर फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता समोर आलेल्या कागदपत्रांवरून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने अहवाल सादर केल्यानंतरही नाफेडने या संस्थांना कांदा खरेदीसाठी पात्र ठरवून त्यांच्याकडून कांदा खरेदी केली जात आहे.
केंद्र सरकारच्या भावस्थिरीकरण योजनेतून २०२६-२७ या आर्थिक वर्षात दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्यातील एक लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी नाफेडच्या माध्यमातून केली जाणार आहे. या एक लाख मेट्रिक टन कांद्यापैकी ९५ हजार मेट्रिक टन कांदा खरेदी नाशिक जिल्ह्यातून करण्यासाठी नाफेडने एप्रिलमध्ये टेंडर प्रसिद्ध केले होते. त्यासाठी १९ सहकारी संस्थांची प्रत्येकी ५ हजार मेट्रिक टन कांदा खरेदीसाठी निवड करण्यासाठी हे टेंडर राबवले.
त्या टेंडरमधून पात्र ठरवण्यात आलेल्या संस्थांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी नाफेडने संबंधित संस्थांनी टेंडरसोबत जोडलेला कागदपत्र जिल्हा उपनिबंधक कार्यालयांकडे पाठवली. त्या कार्यालयाने २५ मे रोजी त्यातील १६ संस्थांच्या कागदपत्रांची पडताळणी करून प्रत्येक संस्थेच्या कागदपत्रांबाबत शेरे मारून त्याचा अहवाल नाफेडला सादर केला आहे. त्या अहवालावरून १९ संस्थांपैकी ३ संस्थांची कार्यकक्षा ही बहुराज्य आहे. यामुळे त्या संस्थांबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने काहीही शेरा मारलेला नाही.
उर्वरित १६ संस्थांबाबत त्यांनी शेरे मारले असून त्यानुसार ११ संस्थांकडे कोणते कागदपत्र नाहीत, अथवा त्यांच्या कागदपत्रांमध्ये काही अपूर्णता आहे, याबाबत शेरा मारला आहे. यामुळे या ११ संस्था नाफेडच्या टेंडरमधील अटींची पूर्तता करीत नसूनही त्यांना नाफेडच्या टेंडर समितीने कांदा खरेदी केंद्रासाठी पात्र ठरवल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. यातील अनेक संस्थांनी कांदा खरेदी विक्री केल्याचे लेखा परीक्षण अहवालात नमूद केले आहे.
प्रत्यक्षात या संस्थांनी त्या खरेदीविक्रीचे बॅंकस्टेटमेंट सोबत जोडलेले नाही. काहींनी कांदा, खरेदी विक्रीचा अनुभव दाखला जोडलेला नाही. काहींनी दोन वर्षापूर्वीचा लेखा परीक्षण अहवाल जोडलेला नसतानाही त्यांना पात्र ठरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे यातील नऊ संस्थांचे कार्यक्षेत्र हे केवळ गाव अथवा तालुक्यापुरते मर्यादित असूनही त्यांना कार्यक्षेत्राबाहेर कांदा खरेदी केंद्र बहाल केले आहे.
टेंडरमध्ये अटीशर्ती टाकल्याच कशाला
कोणत्याही संस्थेकडून टेंडर प्रसिद्ध करताना ते काम करण्यासाठी सक्षम असलेल्या संस्था पात्र ठराव्यात व वेळेत व दर्जेदार काम व्हावे, यासाठी अटीशर्ती निश्चित केल्या जातात. नाफेडनेही त्याच हेतुने अटीशर्ती निश्चित केल्या असाव्यात. त्यानंतरही ११ सहकारी संस्थांकडे अटीशर्तींची पूर्तता करणारी कागदपत्र नसतील, तर त्या संस्थांना कशाच्या आधाराने पात्र ठरवण्यात आल्या हा गंभीर प्रश्न आहे.
याबाबत नाफेडच्या अधिका-यांकडून आम्ही जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे कागदपत्र पडताळणीला दिली असून त्यांच्याकडून कोणत्या संस्था पात्र व कोणत्या अपात्र, असा सुस्पष्ट अहवाल मिळावा, असे पत्र पाठवल्याचे उत्तर देण्यात येत आहे. मुळात टेंडर प्रक्रिया नाफेडने राबवली असल्याने पात्र-अपात्र ठरवण्याचे अधिकार नाफेडला आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना कसे अपात्र अथवा पात्र ठरवणार, असे जिल्हा उपनिंबधक कार्यालयाचे म्हणणे आहे. यामुळे अपात्र असूनही या सहकारी संस्था कांदा खरेदीमध्ये सहभागी झाल्याचे दिसत आहे.
कागदपत्र अपूर्ण असेलेल्या ११ संस्था व त्यांच्याबाबत शेरे
१) पिंपळगाव बसवंत विकास संस्था ( या संस्थेने कांदा खरेदी विक्रीबाबा बॅंक स्टेटमेंट जोडलेले नाही)
२) गोदावरी विकास संस्था, चांदोरी ( कांदा खरेदी विक्रीबाबा बॅंक स्टेटमेंट जोडलेले नाही)
३) राजूरकर बहुउद्देशीय संस्था, रसलपूर( (कांदा खरेदी विक्रीबाबा बॅंक स्टेटमेंट जोडलेले नाही)
४) चांदवड तालुका सेवा सहकारी संस्था ( कांदा खरेदी विक्रीबाबा बॅंक स्टेटमेंट जोडलेले नाही)
५) रेणुका अटल नावीन्यपूर्ण सहकारी संस्था, चांदवड. ( अनुभवाचा दाखला जोडलेला नाही)
६) शेतकरी सहकारी संघ कळवण ( २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल जोडलेला नाही)
७) नांदगाव तालुका तुळजाभवानी शेतकरी विकास संस्था नांदगाव (लेखा परीक्षणासोबद बॅंक स्टेटमेंट जोडलेले नाही, शिल्लक माल दाखवून त्याचा खेळते भांडवल म्हणून समावेश केला आहे. कांदा खरेदी विक्रीचे कागदपत्र उपलब्ध नाही)
८) श्री गुरुजी अटल नावीन्यपूर्ण सहकारी संस्था, जळगाव, ता. नांदगाव. ( कांदा खरेदी विक्रीचे रोखीने व्यवहार दाखवले आहेत. लेखा परीक्षण अहवालात बॅंक स्टेटमेंट जोडलेले नाही)
९) वडगाव गिरणारे आदिवासी विकास संस्था ( (कांदा खरेदीचा केवळ एक वर्षाचा अनुभव, टेंडरनुसार दोन वर्षे आवश्यक)
१०) श्रीशक्ती महिला नावीन्यपूर्ण सहकारी संस्था (संस्था ६ मार्च २०२६ पर्यंत अवसायानात होती, त्यामुळे कांदा खरेदी विक्रीबाबत प्रश्नचिन्ह. लेखापरीक्षणात रोखीच्या व्यवहारावरून आभासी नोंदी. कांदा खरेदी-विक्री नोंद दिसत नाही.
११) वैष्णवी अटल नावीन्यपूर्ण सहकारी संस्था (प्रत्यक्ष कांदा खरेदी दिसत नाही. बॅंकस्टेटमेंट अहवालासोबत जोडलेले नाही.
नऊ संस्थांना दिले कार्यक्षेत्राबाहेर काम
सहकारी संस्थांची स्थापना करताना त्यांचे कार्यक्षेत्र निश्चित केले जाते. सहकार कायद्यानुसार त्या संस्थांनी त्याच कार्यक्षेत्रात काम करणे बंधनकारक असते. असे असूनही नाफेडने अनेक संस्थांना कार्यक्षेत्राबाहेरही कांदी खरेदी केंद्रासाठी पात्र ठरवले आहे. त्यात श्री गुरुजी अटल नावीन्यपूर्ण सहकारी संस्था, जळगाव, ता. नांदगाव या संस्थेचे कार्यक्षेत्र नांदगाव तालुका असताना या संस्थेला लासलगाव येथे कांदा खरेदीकेंद्र मंजूर केले आहे. वडगाव गिरणारे आदिवासी विकास संस्थेचे कार्यक्षेत्र वडगावपुरते मर्यादित असूनही लासलगाव येथे कांदा खरेदीकेंद्र मंजूर केले आहे.
सह्याद्री अटल कृषीपणन या सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र चांदवड तालुक्यापुरते असूनही त्या संस्थेला बागलाण तालुक्यात ताहराबाद येथे खरेदीकेंद्र चालवण्यासाठी पात्र ठरवले आहे. इंदुमती सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र चांदवड असूनही या संस्थेला उमराणे (ता. देवळा) येथील कांदा खरेदीकेंद्र मंजूर केले आहे. कळवण शेतकरी संघाचे कार्यक्षेत्र हे कळवण तालुक्यापुरते मर्यादित असूनही देवळा येथील कांदा खरेदीकेंद्रासाठी पात्र ठरवले आहे. कळवण विकास संस्थेचे कार्यक्षेत्र कळवण गावापुरते मर्यादित असतानाही या संस्थेला देवळा येथील कांदा खरेदी केंद्रासाठी पात्र ठरवले आहे.
गोदावरी विकास संस्थेचे कार्यक्षेत्र केवळ चांदोरी असताना त्या संस्थेला पिंपळगाव बसवंत येथे कांदा खरेदी केंद्र मंजूर केले आहे. राजूरकर कृषी सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र केवळ रसलपूर या गावापुरते मर्यादित असूनही निफाड येथे कांदा खरेदीकेंद्र मंजूर केले आहे. रेणुका अटल नावीन्यपूर्ण सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र चांदवड तालुका असून त्या संस्थेला देवळा येथे कांदा खरेदी केंद्र मंजूर केले आहे.