solar plant Tendernama
उत्तर महाराष्ट्र

मुकणे, मुळा धरणावर फ्लोटिंग सोलर; २३५ मेगावॅट वीजनिर्मितीची तयारी

मुकणे धरणावर ८५, तर मुळा धरणावर १५० मेगावॅट प्रकल्प; दोन्ही प्रकल्पांसाठी खासगी कंपन्यांकडून देकार मागवले

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): केंद्र व राज्य सरकारच्या हरित ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरण आणि अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातील मुळा धरणाच्या जलाशयावर फ्लोटिंग सोलर फोटोव्होल्टाइक प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. मुकणे धरणावर ८५ मेगावॅट, तर मुळा धरणावर १५० मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प प्रस्तावित असून, दोन्ही प्रकल्पांची एकूण क्षमता २३५ मेगावॅट असेल.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने या दोन्ही प्रकल्पांसाठी खासगी कंपन्यांकडून देकार मागवले आहेत. हे प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर विकसित करण्याचे नियोजन आहे. पायाभूत सुविधा, अक्षय ऊर्जा, बॅटरी स्टोरेज आणि गुंतवणूक क्षेत्रातील अनुभवी कंपन्यांना या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

केंद्र सरकारने २०३० पर्यंत अपारंपारिक ऊर्जा क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जलाशयांवरील फ्लोटिंग सोलर हा जमीन बचतीचा पर्याय मानला जातो. सौरऊर्जेची अनिश्चितता कमी करण्यासाठी बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टिम उभारण्यावरही भर दिला जात आहे. महाराष्ट्रानेही २०२५-२६ ते २०३५-३६ या कालावधीसाठी नवीकरणीय ऊर्जा व ऊर्जा साठवणूक धोरण आणले आहे.

मुकणे धरणावर ८५ मेगावॅट

इगतपुरी तालुक्यातील मुकणे जलाशयाच्या सुमारे १२८ हेक्टर जलक्षेत्रात चार स्वतंत्र पट्ट्यांमध्ये फ्लोटिंग सोलर प्रकल्प उभारण्याची प्राथमिक शक्यता अभ्यासातून व्यक्त करण्यात आली आहे. या क्षेत्रात सुमारे ११९ मेगावॅट पीक (DC) आणि ८५ मेगावॅट AC क्षमतेचा प्रकल्प उभारणे शक्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

प्रकल्पात सौरऊर्जेसोबत बॅटरी स्टोरेजची व्यवस्था असेल. २०२८-२९ या आर्थिक वर्षातील संभाव्य व्यावसायिक कार्यान्वयनाचा विचार करता, राज्याच्या नवीकरणीय ऊर्जा व ऊर्जा साठवणूक धोरणानुसार किमान ८५ मेगावॅट क्षमतेच्या ५० टक्के म्हणजे ४२.५ मेगावॅट स्टोरेज पॉवर आणि किमान दोन तासांची स्टोरेज क्षमता अपेक्षित आहे. व्यावसायिक कार्यान्वयनाचा कालावधी पुढे ढकलल्यास स्टोरेज कालावधी चार तासांपर्यंत वाढविण्याची तरतूद प्रस्तावित आहे.

या प्रकल्पासाठी आवश्यक जलक्षेत्र आणि किनाऱ्यावरील पायाभूत सुविधा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडून भाडेपट्ट्याने व सवलत कराराच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. वडिवर्हे उपकेंद्र हे प्रकल्पाच्या जवळचे वीज उपकेंद्र असून ते सुमारे चार किलोमीटर अंतरावर आहे.

मुळा धरणावर १५० मेगावॅट

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील मुळा धरणाच्या जलाशयावर १५० मेगावॅट क्षमतेचा फ्लोटिंग सोलर प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू आहे. हा प्रकल्पही सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून विकसित केला जाणार असून, त्यात बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टिमचा समावेश असेल.

मुळा धरणाच्या सुमारे २३८.६ हेक्टर जलक्षेत्रात चार स्वतंत्र पट्टे फ्लोटिंग सोलरसाठी व्यवहार्य असल्याचे प्राथमिक अभ्यासात आढळले आहे. या क्षेत्रावर सुमारे २०९.६८ मेगावॅट पीक (DC) आणि १५० मेगावॅट AC क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे.

मुळा धरण सिंचनासोबतच पिण्याचे पाणी, मत्स्यव्यवसाय आणि जलविद्युत निर्मितीसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे सौर प्रकल्पाची रचना करताना सिंचन व्यवस्था, पाण्याची पातळी, स्पिलवे, मुख्य जलप्रवाह, जलविद्युत सुविधा आणि धरण सुरक्षिततेशी संबंधित क्षेत्रे वगळून फ्लोटिंग सोलर उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Key Points

  • मुकणे आणि मुळा धरणाच्या जलाशयावर फ्लोटिंग सोलर प्रकल्प उभारण्याची तयारी,

  • मुकणे धरणावर ८५ मेगावॅट, मुळा धरणावर १५० मेगावॅट क्षमता,

  • दोन्ही प्रकल्पांची एकूण प्रस्तावित क्षमता २३५ मेगावॅट,

  • प्रकल्पांमध्ये बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टिमचाही समावेश,

  • सार्वजनिक-खासगी भागीदारीतून प्रकल्प विकसित करण्यासाठी खासगी कंपन्यांकडून देकार मागवले.