Kumbh Mela Tendernama
उत्तर महाराष्ट्र

AI In Mahakumbh: नाशकातील सिंहस्थामध्ये 'डिजिटल कुंभ' अन् एआयचा वापर

Sinhastha Mahakumbh: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा घेतला आढावा. नाशिकमधील नवीन रिंग रोड, साधू ग्रामच्या कामांना वेग देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbia): नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची सर्व कामे दर्जेदार आणि गतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत.

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेषत: नाशिकमधील नवीन रिंग रोड आणि साधू ग्राम/टेंट सिटी च्या कामांवर तातडीने लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले आहेत. या कामांमध्ये कोणताही विलंब खपवून घेतला जाणार नाही, असे त्यांनी बजावले.

बैठकीत, मुख्यमंत्री फडणवीस यांनी पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या कामांना गती देण्यावर भर दिला, तसेच दीर्घकाळ टिकणाऱ्या सुविधा निर्माण करण्यावर लक्ष देण्याचे सूचित केले.

नाशिकमधील नवीन रिंग रोडचे काम त्वरित पूर्ण करावे आणि या कामासाठी आवश्यक निधी तातडीने मंजूर करून घ्यावा. कुंभमेळ्यापूर्वी इतर रस्त्यांची कामे देखील त्वरित हाती घेण्यात यावीत, जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेव्दारे बस सेवेचे नियोजन करण्यात यावे. तसेच, वाहनतळांच्या ठिकाणी भंडारा/लंगरची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. द्वारका सर्कल येथील कामे तातडीने पूर्ण करावीत. साधूग्राम/टेंट सिटीसाठीची भूसंपादनाची कामे गतीने पूर्ण करावीत.

विविध आखाड्यांशी चर्चा करून त्यांच्या गरजेनुसार साधूग्राममध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. संपूर्ण कुंभमेळा काळात आणि नेहमीसाठीही रामकुंडात आणि नदीपात्रातील पाणी स्वच्छ राहील यावर कटाक्षाने भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मलनि:स्सारणाची कामे प्राधान्याने हाती घेऊन वेगाने पूर्ण करण्यात यावीत. विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनीही मलनि:स्सारणाची कामे वेगाने पूर्ण करण्यास प्राधान्य देत असल्याचे सांगितले.

विमानतळे आणि रेल्वे सुविधांची कामेही गतीने पूर्ण करावीत. पायाभूत सुविधांबरोबरच, गर्दीचे प्रभावी नियोजन आणि सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. सीसीटीव्ही कॅमेरे प्रणाली केंद्रीकृत पद्धतीने तयार करण्यात यावी.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 'एआय' (Artificial Intelligence) च्या विविध पर्यायांचा तसेच 'मार्व्हल'चा उपयोग करण्यात यावा. पोलिसांच्या निवासासाठीची व्यवस्था प्राधान्याने करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

कुंभमेळ्यासाठीच्या आवश्यक कामांसाठी जिल्हास्तरावरील नोकरभरतीलाही गती देण्याचे निर्देश देण्यात आले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तयार होणाऱ्या सुविधा दीर्घकालीन असाव्यात, असे मत व्यक्त केले. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व कामे दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण होतील याकडे लक्ष देण्याचे सांगितले.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नदीपात्रातील पाण्याची शुद्धता आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही यावर भर दिला. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जवळपासच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासकामांनाही गती देण्याची सूचना केली.

कुंभमेळ्याच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी 'डिजिटल कुंभ' ही संकल्पना राबविण्यात यावी, असा निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. तसेच, कुंभमेळ्याच्या कामांसंदर्भात कोणत्याही प्रकारची नकारात्मक प्रसिद्धी होत असल्यास, संबंधित विभागाने त्वरित वस्तूनिष्ठ खुलासा माध्यमांना देण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.