नाशिक (Nashik): महाराष्ट्र सरकारने विदर्भ-मराठवाड्याला थेट मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाची उभारणी केल्यानंतर नागपूर गोवा या शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून नागपूर ते पश्चिम महाराष्ट्र जोडण्याचे प्रयत्न सुरू असतानाच मराठवाड्यातील उर्वरित भागासह अहिल्यानगरला मुंबईला जोडण्यासाठी कल्याण ते लातूर हा महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) प्रस्तावित केला आहे.
या द्रुतगती महामार्गाला अखेर मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदिल दाखवला आहे. हा ४४२ किलोमीटर लांबीच्या महामार्गामुळे कल्याण ते लातूर हे अंतर सध्याच्या १०-११ तासांऐवजी केवळ चार तासांत पार करता येणार आहे.
नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशन सुरू असून तेथे दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेतला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने राज्यात ४२००किलोमीटरचे रस्ते कॉरिडॉर उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार त्या बैठकीत शक्तिपीठसह इतर प्रस्तावित मार्गांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले.
त्यात कल्याण-लातूर या ४४२ किलोमीटरच्या द्रुतगती महामार्गाचेही सादरीकरण झाले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या द्रुतगती महामार्गाला तत्त्वता मंजुरी दिली असून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले जात आहे.
कल्याण लातूर या महामार्गामुळे समृद्धी महामार्गापासून वंचित राहिलेला मराठवाड्यातील भाग आता थेट मुंबईला जोडला जाणार आहे. परिणामी मराठवाड्यातील आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि वाहतूक कोंडी कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
या महामार्गाची एकूण किंमत सुमारे ३५,००० कोटी रुपये असून, त्यात माळशेज घाटात ८ किलोमीटरच्या बोगद्याचा समावेश आहे. हा द्रुतगती महामार्ग कल्याणपासून सुरू होऊन माळशेज घाट, अहिल्यानगर, बीड, मांजरसुंबा, अंबाजोगाईमार्गे लातूरपर्यंत करण्याचे नियोजन आहे. लातूर शहरानंतर त्याचा महाराष्ट्र-कर्नाटक सीमेपर्यंत विस्तार केला जाणार आहे.
महाराष्ट्र जोडणारा महामार्ग
कल्याण-लातूर हा द्रुतगती महामार्ग राज्यातील इतर प्रमुख महामार्गाशी जोडला जाणार आहे. मुंबई व उपनगरे यांना हा महामार्ग वापरता यावा म्हणून तो विरार-अलिबाग या बहुउद्देशीय मार्गिकेला जोडला जाणार आहे. त्यानंतर माळशेज घाट संपल्यावर तो नाशिक-पुणे महामार्गाला जोडला जाणार आहे. याशिवाय अहिल्यानगरमध्ये हा द्रुतगती महामार्ग नाशिक-चेन्नई या प्रस्तावित महामार्गाला जोडला जाईल. तसेच त्याच भागात तो नगर-पुणे व नगर-संभाजी नगर या महामार्गाना जोडला जाईल.
विशेष म्हणजे नगर येथून तो नाशिक व संभाजी नगर या जिल्ह्यांतील समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. लातूरमध्ये तो प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गालाही जोडला जाणार आहे. या महामार्गामुळे राज्यातील प्रमुख महामार्ग एकमेकांना जोडले जाऊन कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्र एकमेकांशी थेट जोडले जाणार आहेत.
या महामार्गामुळे मराठवाड्यातील शेती, उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला फायदा होईल. माळशेज घाटातील बोगदा या प्रकल्पातील प्रमुख अभियांत्रिकी वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे डोंगराळ भागातील प्रवास सुलभ होईल.
एमएसआरडीसीने या प्रकल्पाची योजना काही वर्षांपूर्वीच आखली होती. त्यानुसार नागपूर-गोवा शक्तिपीठ एक्सप्रेसवेला हा महामार्ग जोडण्याचे सूतोवाच करण्यात आले होते. हा प्रकल्पआतापर्यंत केवळ कागदावरच प्रस्तावित स्वरूपात होता. त्याला राजकीय आणि प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा होती. आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या तत्वतः मंजुरीनंतर तो प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
या महामार्गामुळे मराठवाड्यातील शेतकरी, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना मुंबईशी थेट जोडणी मिळेल. व्यापार वाढेल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि पर्यटनाला चालना मिळेल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे म्हणणे आहे.