Pune Tendernama
पुणे

बिल आल्यावर अधिकाऱ्यांना जाग; टेंडर न काढताच दिले काम...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महानगर पालिकेच्या (Pune Municipal Corporation)) गणेश कला क्रीडा रंगमंच आणि येरवड्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनात साउंड सिस्टम आणि ऑपरेटींगचे टेंडर (Tender) नसतानाही केवळ तोंडी आदेशावर ठेकेदाराकडून कामे करून घेण्यात आली आहेत. त्यामुळे आता या ठेकेदाराने पैसे मागण्यास सुरवात केल्यानंतर विद्युत विभागातील हा गोंधळ समोर आला आहे. गेल्या चार महिन्यांपासून हे काम सुरू असले तरी विद्युत विभागातील अधिकाऱ्यांनी याची मान्यता घेण्याची तसदी दाखवली नसल्याने या कारभारावर प्रश्‍न उपस्थित होत आहे.

महापालिकेचे शहराच्या विविध भागात नाट्यगृह आणि सांस्कृतिक केंद्र आहेत. याठिकाणी सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रम होत असतात. या ठिकाणी महापालिकेची साउंड सिस्टीम व प्रकाश व्यवस्था असली तरी त्याची देखभाल करण्यासाठी मनुष्यबळ नाही, त्यामुळे ठेकेदाराच्या माध्यमातून ही कामे केली जात आहे.

नेमके काय झाले?
- गणेश कला क्रीडा रंगमंच आणि येरवडा येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक भवन येथील साउंड सिस्टम्स आणि ऑपरेटींगची कामासाठी नेमलेल्या ठेकेदाराची मुदत नोव्हेंबर २०२१ मध्ये संपली
- पुढील वर्षभरासाठी प्रत्येकी १० लाख रुपयांचे टेंडर काढले जाणार होते
- कोरोना संपल्यानंतर विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यासाठी वित्तीय समितीची मंजुरी घेणे, टेंडर प्रक्रिया राबवणे यासाठी प्रस्ताव तयार केला नाही
- त्याच दरम्यान, कोरोनाची लाट ओसरत असल्याने न्याट्यगृहांमध्ये कार्यक्रम सुरू झाले
- त्यामुळे जुन्याच ठेकेदारास तोंडी सूचना देत जानेवारी ते मार्च २०२२ असे तीन महिने त्यांच्याकडून काम करून घेतले

अडचण काय?
- वर्क ऑर्डर नसतानादेखील संबंधित ठेकेदाराने काम केले
- कामगारांचे पीएफ आणि इएसआयचे पैसे भरण्यासाठी निधी आवश्‍यक असल्याने ठेकेदाराने पैसे मागण्यास सुरवात केली
- या दोन्ही कामांची सुमारे पाच लाख रुपयांचे बिल महापालिकेकडे आले
- पैसे मंजूर करावेत अशी मागणी केली
- विद्युत विभागाच्या प्रमुखांकडून ठेकेदाराची झाडाझडती करत तोंडी आदेशावर काम कसे केले असा प्रश्‍न उपस्थित
- विद्युत विभागातील उप व कनिष्ठ अभियंत्यांकडूनही नियमांचे पालन न झाल्याने त्यांच्यावर कारवाईचे संकेत

दोन साउंड सिस्टम आणि ऑपरेटींगची कामे एका ठेकेदाराला दिली होती, त्याने मुदत संपल्यानंतरही तोंडी आदेशावर कामे केली आहेत. याची खातरजमा करून पुढील कार्यवाही केली जाईल, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
- श्रीनिवास कुंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग