PMC Pune
PMC Pune Tendernama
पुणे

Pune : पुणे महापालिका अतिक्रमणांना दणका देणार का? कारवाईचा वेग वाढणार का?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरात अतिक्रमण कारवाई करताना त्यासाठी गाडी उपलब्ध नाही, मनुष्यबळ नाही, असे सांगून क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांकडून कारवाई टाळली जाते. मात्र, आता गाडी नाही म्हणून अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यासाठी महापालिकेने २ कोटी १४ लाख रुपये खर्चून कारवाईसाठी १० गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला धडक कारवाई पथक असे नाव दिले जाणार आहे. त्यामुळे आता तरी कारवाईचा वेग वाढणार का? हे पहावे लागणार आहे.

शहरात अतिक्रमणांचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर, पादचारी मार्गांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. दुकानदार दुकानातील माल रस्त्यावर ठेवतातच, त्याशिवाय हातगाडे, स्टॉल, टपऱ्यांची संख्याही वाढत आहे. अतिक्रमण कारवाई करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला गाडी दिलेली आहे. त्यात सुरक्षा रक्षक, पोलिस, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता यांचा समावेश आहे. पण क्षेत्रीय कार्यालयाकडील या गाड्या जुन्या झाल्या आहेत.

त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संयुक्त कारवाई करताना इतर क्षेत्रीय कार्यालयांकडे गाड्या व मनुष्यबळाची मागणी केली जाते. त्यावेळी गाडी नादुरुस्त असल्याची उत्तरे दिली जातात. अधिकाऱ्यांकडून ही पळवाट शोधली जात असल्याने अतिक्रमण करणाऱ्यांनाच अभय मिळत आहे.

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर ‘धडक कारवाई पथक’ निर्माण करण्याचा निर्णय केला आहे. यासाठी पथ विभागाकडून मोटर वाहन विभागाला निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यातून गाड्या खरेदीला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. मे. एस. एम. ईसुजू लि. या ठेकेदाराकडून २ कोटी १४ लाख ४५ हजार रुपयांच्या १० गाड्या घेतल्या जाणार आहेत.

धडक कारवाई पथक असे काम करेल

- शहरातील संयुक्त कारवाईसाठी पथक कार्यरत असेल

- क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत मिशन १५ मधील अतिक्रमणांवर प्रतिबंध करणे

- पथकाने क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत दिवसभर पेट्रोलिंग करणे

- अतिक्रमण दिसताच त्वरित कारवाई करणे

- अतिक्रमण कारवाईचा दैनंदिन अहवाल सादर करणे

क्षेत्रीय कार्यालयांना अतिक्रमण कारवाईसाठी प्रत्येकी एक गाडी आहे. पण आता धडक कारवाई पथकासाठी १० गाड्या घेतल्या जाणार आहेत. हे पथक प्रमुख रस्त्यांसह प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील महत्त्वाच्या रस्त्यांवर दिवसभर पेट्रोलिंग करून अतिक्रमणे रोखेल.

- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त

फेब्रुवारी २०२३ ते जानेवारी २०२४ पर्यंत केलेल्या कारवाया

स्टॉल - २९७

हातगाडी - ४०१३

पथारी - ३०५५४

सिलिंडर - १०५२

शेड - ५७५६

इतर - २३,३४३

व्यावसायिक वाहने - ४१५