PCMC Tendernama
पुणे

PCMC : स्मार्ट सिटीतील नागरिकांनी का दिला आंदोलनाचा इशारा?

Smart City : मंडईसाठी अधिकृत जागा उपलब्ध नसल्याने विक्रेते परत रस्त्यावरच बसतात. परिणामी, वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे.

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : स्मार्ट सिटी योजने अंतर्गत झालेल्या विविध विकास कामांनंतरही पिंपळे गुरव परिसरात अधिकृत भाजी मंडईसाठी जागा उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिक आणि भाजी विक्रेते दोघांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे भाजी आणि फळ विक्रेत्यांची संख्या वाढत आहे. मात्र, अधिकृत मंडई नसल्याने हे विक्रेते रस्त्यांवर किंवा पादचारी मार्गांवर दुकाने लावत आहेत. त्यामुळे, वाहतूक कोंडीबरोबरच अपघाताचा धोका वाढला आहे.

पिंपळे गुरव परिसरातील मुख्य बाजारपेठ आणि साठ फुटी रस्ता, सृष्टी चौक, कृष्णा चौक, काटेपुरम चौक, एम.एस.काटे चौक यासारख्या मुख्य ठिकाणी भाजी आणि फळ विक्रेत्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनधिकृत दुकाने थाटली आहेत. त्यामुळे पादचारी आणि वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

महापालिकेकडून अनधिकृत दुकानदारांवर वेळोवेळी कारवाई केली जाते. परंतु मंडईसाठी अधिकृत जागा उपलब्ध नसल्याने विक्रेते परत रस्त्यावरच बसतात. परिणामी, वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना वाहतुकीच्या समस्येमुळे रोजच त्रास सहन करावा लागत आहे.

स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे तातडीने समस्येचे निराकरण करण्याची मागणी केली आहे. अधिकृत मंडईची व्यवस्था केल्यास विक्रेत्यांना ठराविक जागा मिळेल. त्याने रस्त्यांवरील अतिक्रमण थांबेल. तसेच स्वच्छतेचा प्रश्न आणि वाहतूक कोंडीची समस्या सोडवली जाऊ शकते. त्यासाठी महापालिकेने लवकरात लवकर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

महापालिकेकडून या प्रश्नाकडे तातडीने लक्ष दिले गेले नाही; तर आंदोलन करावे लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.