Khadakwasla Dam Pune
Khadakwasla Dam Pune Tendernama
पुणे

Pune : 2024 ठरणार महत्त्वाचे! पुणेकरांना मिळणार 'ही' गुड न्यूज

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरासह उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा कमी होत आहे. असे असताना दुसरीकडे नवे वर्ष महापालिकेसाठी पाणी गळती कमी करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. या वर्षी पाचपैकी चार पॅकेजमधील समान पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होणार असल्याने गळती कमी होण्याच्या कामास सुरुवात होईल. त्यामुळे ४० टक्के पाण्याची होणारी गळती टप्प्याटप्प्याने थांबणार आहे. त्यातून पुणेकरांना मुबलक पाणी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

पुणे शहराला खडकवासला, भामा आसखेड, पवना या धरणांमधून रोज १६५० एमएलडी पाणी उपलब्ध केले जात आहे. यापैकी ४० टक्के पाण्याची विविध टप्प्यांवर गळती होते. यात पुणेकरांच्या वाट्याच्या ६६० एमएलडी पाण्याची थेट नासाडी होत असल्याने संपूर्ण शहरात असमान व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. महापालिकेने २०१७ मध्ये १ हजार ९७३ कोटी रुपयांच्या समान पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेतले. याची पाच पॅकेजमध्ये विभागणी करून प्रत्येक कामाची टेंडर काढली आहे. पॅकेज एक, दोन, तीन आणि पाचचे काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होईल, तर पॅकेज चारचे काम २०२६ मध्ये पूर्ण होणार आहे.

समान पाणीपुरवठा योजनेचे एकूण १४१ झोन आहेत, त्यापैकी ४१ झोनचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. महापालिकेला हे झोन ठेकेदाराकडून हस्तांतरित झाल्यानंतर प्रत्येक वर्षी २० टक्के याप्रमाणे पुढील पाच वर्षांत १०० टक्के गळती रोखण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. प्रत्यक्षात महापालिका १०० टक्के गळती रोखू शकत नसली तरी गळतीचे प्रमाण ५० टक्के कमी करून शकते. त्यामुळे सध्याच्या पाणी वापरानुसार रोज वाया जाणारे ६६० एमएलडीपैकी ३३० एमएलडी पाण्याची बचत होऊ शकते.

दिवसात १५४.० एमएलडी गळती रोखली

पाणीपुरवठा विभागाने गेल्या आठवड्यात गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला होता. त्या वेळी लष्कर केंद्र ते फुरसुंगी पंपिंग स्टेशन या दरम्यानची जलवाहिनी जोडून रोज २२ एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. यापूर्वी २२ एमएलडी पाण्यासाठी कालव्यातून १७२ एमएलडी पाणी सोडले जात होते. त्यातील १५० एमएलडी पाणी वाया जात होते. पण हे काम झाल्याने १५० एमएलडी पाण्याची नासाडी रोखली गेली. त्याचप्रमाणे वारजे जलकेंद्रात जलवाहिनी दुरुस्तीचे काम करून २.८ एमएलडी, पद्मावती जुने केंद्र १.५ एमएलडी आणि लष्कर नवे केंद्र येथे ०.५ एमएलडी पाण्याची बचत केली आहे.

१०.३० लाख लोकांसाठी पाणी उपलब्ध

एक एमएलडी म्हणजे १० लाख लिटर पाणी. महापालिका रोज एका व्यक्तीला १५० लिटर पाणी देते. याप्रमाणे एका एमएलडीतून ६ हजार ६६६ लोकांचा पाणी पुरवठा केला जातो. महापालिकेने गेल्या आठवड्यात १५४.५ एमएलडी पाण्याची गळती रोखली. म्हणजेच दैनंदिन पाणी वापरातील १५ कोटी ४५ लाख लिटर पाण्याचा अपव्यय बंद केला आहे. त्यामुळे त्याचा १० लाख ३० हजार नागरिकांना फायदा होणार आहे. यातील फुरसुंगीचे १५० एमएलडी पाणी महापालिकेच्या एकूण पाणी कोट्यातून कमी होणार असल्याने महापालिकेची आर्थिक बचतही होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

समान पाणीपुरवठा योजनेचे बहुतांश काम २०२४ मध्ये पूर्ण होणार आहे. त्यामुळे गळती रोखण्याचे कामही या वर्षी सुरू होईल. आत्तापर्यंत १४१ पैकी ४१ झोनचे काम पूर्ण झाले आहे. त्यांचे महापालिकेकडे हस्तांतर झाल्यानंतर पाणीगळती दरवर्षी २० टक्क्यांनी कमी करून पाच वर्षांत पूर्णपणे गळती रोखली जाईल. त्यामुळे खडकवासल्यासह इतर धरणातून पुणे शहरासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होईल.

- नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग