Pune City Tendernama
पुणे

Pune : विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी आता नक्की फुटणार! काय आहे कारण?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : गणेशखिंड रस्ता (Ganeshkhind Road) रुंदीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आवश्‍यक जागांपैकी १२ जागा महापालिकेच्या (PMC) ताब्यात आल्या आहेत, तर उर्वरित जागा येत्या तीन महिन्यांत महापालिकेच्या ताब्यात येण्याची शक्‍यता आहे. उर्वरित जागा ताब्यात आल्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) प्रवेशद्वारासमोरील आचार्य आनंदऋषीजी महाराज चौक ते संचेती रुग्णालय या दरम्यानचा वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटण्याची शक्‍यता आहे.

गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील (आचार्य आनंदऋषीजी महाराज चौक) चौकापासून रेंजहिल्स कॉर्नरपर्यंत बहुमजली उड्डाण पूल बांधला जात आहे. या रस्त्यावरच मेट्रो प्रकल्पाचे कामही वेगात सुरू आहे.

दरम्यान, या प्रकल्पांची कामे एकीकडे सुरू असतानाच गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेकडून रस्ता रुंदीकरणाचेही काम केले जात आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी रस्ता रुंदीकरणासाठी आवश्‍यक जागा ताब्यात घेण्यासाठी पुढाकार घेतल्याने रुंदीकरणाचा मार्ग मोकळा होण्यास सुरुवात झाली.

पहिल्या टप्प्यातील रिझर्व्ह बँकेच्या कृषी महाविद्यालयासमोरील काम वगळता एक किलोमीटरच्या रुंदीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. रुंदीकरणासाठी आवश्‍यक रिझर्व्ह बँकेच्या कृषी महाविद्यालयाची जागा ताब्यात येण्याचाही मार्ग आता मोकळा झाला आहे. गणेशखिंड रस्त्यावरील रेंजहिल्स कॉर्नरच्या बाजूकडील रिझर्व्ह बँकेच्या कृषी महाविद्यालयासमोरील जागेत उड्डाणपूल उतरणार (रॅम्प) आहे. त्यादृष्टीने तेथे काम सुरू करण्यात येणार आहे.

दरम्यान, संचेती रुग्णालय ते रिझर्व्ह बँकेचे कृषी महाविद्यालय या दरम्यान रस्ता रुंदीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम होणार आहे. या टप्प्यामध्ये महापालिका, भारतीय हवामान खाते, कृषी महाविद्यालय, भारतीय आयुर्विमा महामंडळ, टपाल कार्यालये, आकाशवाणी यांसारखी केंद्र व राज्य सरकारची कार्यालये आहेत.

केंद्र व राज्य सरकारच्या कार्यालयांची संख्या कमी असली तरीही त्यांच्याकडून रुंदीकरणासाठी आवश्‍यक जागा मोठी आहे. खासगी जागा ताब्यात घेण्यासाठी तसेच केंद्र व राज्य सरकारच्या संस्थांकडील जागा रुंदीकरणासाठी मिळाव्यात यासाठीची प्रक्रिया महापालिकेकडून सुरू आहे.

येत्या तीन महिन्यांत संबंधित जागा महापालिकेच्या ताब्यात येऊन रुंदीकरणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती पथ विभागाचे उपअभियंता मनोज गाठे यांनी दिली.

गणेशखिंड रस्ता रुंदीकरणासाठी आवश्‍यक मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही मालमत्ता महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. उर्वरित मालमत्ता ताब्यात येण्यासाठीची प्रक्रिया करण्यात येत आहे.

- महेश पाटील, अप्पर आयुक्त, पुणे महापालिका

गणेशखिंड रस्ता रुंदीकरण वैशिष्ट्ये

- पहिल्या टप्प्यात झालेले रस्ता रुंदीकरण - १ किलोमीटर

- पहिल्या टप्प्याच्या रुंदीकरणातील मालमत्ता - २४

- दुसऱ्या टप्प्यात होणारे रुंदीकरण - २ किलोमीटर

- दुसऱ्या टप्प्याच्या रुंदीकरणातील मालमत्ता - ५२

- दुसऱ्या टप्प्याच्या रुंदीकरणासाठी ताब्यात आलेल्या मालमत्ता - १२ (११ खासगी, १ महापालिका)

- दुसऱ्या टप्प्यातील खासगी मालमत्तांची संख्या - ३८

- दुसऱ्या टप्प्यातील सरकारी मालमत्ता - १४