पुणे (Pune) : वाहनांद्वारे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांना प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे. मात्र, अनेक वाहनचालकांचे याकडे दुर्लक्ष होते. परिणामी, प्रदूषणास कारणीभूत ठरणारे वाहन रस्त्यावर धावत राहते. (Pune Air Pollution News)
अशा वाहनांना मज्जाव करण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कारवाई केली. यात सुमारे १३ हजार वाहनांची तपासणी करण्यात आली, तर ४ हजार वाहनांवर प्रत्यक्षात कारवाई केली. यातून सुमारे ६४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
ही कारवाई १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२४ दरम्यान करण्यात आली. सध्या थंडीचा हंगाम सुरू आहे. धुक्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. धुक्यामुळे हवेची गुणवत्ता खराब होते. परिणामी, हवेच्या प्रदूषणाचा स्तर वाढत जातो. येणाऱ्या काळात पुण्यात हवेचे प्रदूषण वाढू शकते. त्यामुळे पुणे ‘आरटीओ’देखील ‘पीयूसी’ नसलेल्या वाहनांवर कारवाईचे प्रमाण वाढविणार आहे.
गेल्या महिन्यात आरटीओच्या वायुवेग पथकाने ५ हजार ३२३ वाहनांची तपासणी केली. यात १४६५ वाहनचालकांकडे पीयूसी प्रमाणपत्र नव्हते. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून १९ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
हे लक्षात ठेवा
- वाहनाच्या प्रकारानुसार ‘पीयूसी’चे दर आकारले जातात
- ‘पीयूसी’ नसेल तर दुचाकीसाठी दोन हजार दंड
- चारचाकीसाठी चार हजार रुपयांचा दंड
वाहनांना ‘पीयूसी’ प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांची ‘पीयूसी’ची चाचणी केली जाते. येत्या काळात प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई केली जाईल.
- अर्चना गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे