पुणे (Pune) : पुणे ते शिरूर या प्रस्तावित ५४ किमी बहुमजली उन्नत मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सात हजार ५१५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे काम सुरू होण्याआधी वाघोली परिसरातील दोन बाह्यवळण रस्त्यांचा विकास न झाल्यास पुणेकरांना तीव्र वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे.
उन्नत मार्गाचे भव्य स्वरूप
रामवाडीपासून सुरू होणाऱ्या या सहापदरी बहुमजली उन्नत मार्गावर सर्वांत वर मेट्रो मार्गिका, मधोमध हलकी वाहने व तळमजल्यावर जड वाहतुकीसाठी व्यवस्था असणार आहे. हे काम ‘बांधा-वित्त-चालवा-हस्तांतरित करा’ (डीएफबीओटी) तत्त्वावर व महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या (एमएसआयडीसी) माध्यमातून राबवले जाणार आहे.
बाह्य रस्त्यांची निकड का?
- पुणे-नगर महामार्गावर दररोज दीड लाखांहून अधिक वाहनांची वाहतूक
- पुणे-नगर महामार्गावर आधीच वाहतूक कोंडीचे संकट
- वाघोली परिसरात अरुंद रस्ते, दगडखाणी, क्रशर उद्योग, शैक्षणिक संस्था व एमआयडीसीमुळे
जड वाहतूक मोठ्या प्रमाणावर
- उन्नत मार्गाचे काम किमान तीन वर्षे चालणार
- वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवणे अत्यावश्यक
- महापालिकेच्या पूर्व प्रवेशद्वाराचा दाट लोकवस्ती असलेला भाग असल्यामुळे योग्य नियोजनाची गरज
कोणते आहेत प्रस्तावित बाह्य रस्ते?
१) खराडी- वाघोली- विठ्ठलवाडी रस्ता
अंतर- ७५५० मीटर, रुंदी- ३० मीटर
जागा उपलब्ध, कमी भूसंपादनाची गरज
२) लोहगाव- वाघोली- लोणीकंद रस्ता
अंतर- ५०७० मीटर, रुंदी- ३० मीटर
काही ठिकाणी भूसंपादन व एफएसआय-टीडीआर देण्याची आवश्यकता
बाह्य रस्त्यांचे फायदे
- हे दोन्ही मार्ग पुणे-नगर महामार्गासाठी बायपास ठरतील
- जड वाहतूक लोहगावमार्गे वळवता येईल, तर हलकी वाहने खराडीमार्गे मार्गस्थ होतील
- पुणे-नगर महामार्ग वाघोली परिसरातील स्थानिक नागरिकांसाठी मोकळा राहील
- वाहतूक कोंडी टळेल आणि उन्नत मार्गाचे काम सुरळीत पार पडेल
महापालिकेची तयारी
- पुणे महापालिकेकडून दोन्ही बाह्यवळण रस्त्यांसाठी ३७४ कोटी रुपयांची तरतूद
- आर.पी. रस्ते म्हणून या मार्गांची निवड करण्यात आली आहे
- टेंडर प्रक्रिया सध्या सुरू असून, काही अंशी प्राथमिक कामही पूर्ण झाले आहे
बहुमजली उन्नत मार्गाच्या कामाआधी दोन्ही बाह्यवळण रस्त्यांचे काम होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी महापालिकेकडे वारंवार मागणी केली असून, बैठका झाल्या आहेत. दोन्ही रस्ते विकसित केल्यास उन्नत मार्गाच्या कामात अडथळा येणार नाही.
- ज्ञानेश्वर कटके, आमदार, शिरूर-हवेली