
पुणे (Pune): हडपसर रेल्वे स्थानकावरची सिग्नल यंत्रणा ही आता आधुनिक झाली आहे. रविवारी (ता. २०) १८ तासांचा ब्लॉक घेऊन संगणकीकृत सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. शिवाय ‘लूप लाइन’ला मुख्य लाइनशीदेखील जोडण्यात आले.
रेल्वे प्रशासनाने हडपसर स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा सुरू केल्याने रेल्वे गाड्यांचे परिचालन सुरक्षित व गतिमान होण्यास मदत मिळणार आहे. येत्या काही दिवसांत हडपसर टर्मिनलहून नवीन रेल्वे गाड्याची सेवा सुरू होईल. हे काम झाल्याने नवीन रेल्वे गाड्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
हडपसर टर्मिनल विकसित करण्यासाठी रेल्वे बोर्डाने सुमारे ९३ कोटींचा निधी पूर्वीच दिला. त्याचे काम गेल्या काही महिन्यापासून सुरू होते. यातील महत्त्वाचा टप्पा मार्गी लागला. रविवारी घेण्यात आलेल्या ब्लॉकमध्ये पूर्वीची ‘रूट रिले इंटरलॉकिंग’ ही प्रणाली काढून टाकण्यात आली आहे. नवी प्रणाली संगणकीकृत असल्याने एका क्लिकवर गाड्यांना सिग्नल व पॉइंट बदलले जाईल. ही प्रक्रिया अवघ्या १५ ते २० सेकंदात पूर्ण होते. पूर्वीच्या ‘रूट रिले इंटरलॉकिंग’मध्ये या प्रक्रियेसाठी २ ते ३ मिनिटे लागत होते.
‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’ म्हणजे काय?
रेल्वे स्थानकांवर ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’ ही एक आधुनिक, संगणकीकृत सुरक्षा यंत्रणा आहे. रेल्वे गाड्यांचे परिचालन व सिग्नलिंग यंत्रणा सुरक्षितरीत्या चालविण्यासाठी वापरली जाते. ही यंत्रणा पूर्वीच्या मॅन्युअल आणि रिले-आधारित सिग्नलिंग यंत्रणेचे अपग्रेड आहे.
ही यंत्रणा कशी कार्य करते?
- रेल्वे कोणत्या रुळावर जाईल, त्यासाठी आवश्यक सिग्नल्स, पॉइंट्स (जिथे ट्रॅक बदलतो) व अन्य यंत्रणा स्वयंचलित पद्धतीने नियंत्रित केल्या जातात.
- सर्व सिग्नल आणि पॉइंट्स संगणकाद्वारे इंटरलॉक म्हणजेच एकमेकांशी जोडलेले असतात. त्यामुळे चुकीचा सिग्नल अथवा चुकीचा मार्ग मिळणार नाही.
- एकाच मार्गावर एकाचवेळी दोन गाड्या येण्याची शक्यता खूपच कमी असते.
फायदे काय?
- ही यंत्रणा अधिक सुरक्षित
- सिग्नल आणि पॉइंट्स जलद व अचूक बदलले जातात
- अपघाताचा धोका कमी
- एकाच ठिकाणाहून संपूर्ण स्थानकाची वाहतूक नियंत्रित केली जाते
- वेळेची बचत, रेल्वे गाड्यांना उशीर होण्याचे प्रमाण कमी
हडपसर स्थानकावर ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. तसेच, प्रवाशांच्या दृष्टीने आवश्यक सुविधादेखील उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
- पद्मसिंह जाधव, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे