
मुंबई (Mumbai): ठाणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शिळफाटा-कल्याण-राजनोली असा तब्बल 21 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल प्रस्तावित आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यासाठी सल्लागार नियुक्त करणार आहे. त्याची टेंडर (Tender) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मुंबई-नाशिक महामार्ग हा खूपच वर्दळीचा आहे. या मार्गावर मुंबई, ठाणे येथील नागरिकांना थेट प्रवेश करता येतो. पण डोंबिवली, शिळफाटा परिसरातील नागरिकांना भिवंडी किंवा कल्याण येथून नाशिक महामार्गावर पोहोचावे लागते. तसेच मोठ्या वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतो. त्यामुळेच हा 21 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल तयार केला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या प्रकल्पाचा डीपीआर तयार केला आहे. या एमएसआरडीसीच्या डीपीआरचा अभ्यास एमएमआरडीए करणार आहे. या संदर्भात एमएममआरडीएने सल्लागाराच्या नियुक्तीसाठी टेंडर काढले आहे. या सल्लागाराला एमएसआरडीसीने तयार केलेल्या डीपीआरचा आढावा घ्यायचा आहे.
हा उड्डाणपूल ज्या ठिकाणी उभारला जाणार आहे. त्याच भागातून मेट्रो सुद्धा जाणार आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण उन्नत मेट्रो 5, कल्याण-तळोजा-पेंधर उन्नत मेट्रो 12 आणि बदलापूर कांजुरमार्ग मेट्रो 14 या ठिकाणाहून प्रस्तावित आहे. त्यामुळे शिळफाटा-कल्याण-राजनोली उड्डाणपूल उभा करताना मेट्रो मार्गिकांच्या डीपीआरची सुद्धा पाहणी करुन अभ्यास केला जाणार आहे.
शिळफाटा-कल्याण-राजनोली उड्डाणपूल उभारल्यानंतर डोंबिवली, शिळफाटा परिसरातील नागरिकांना मुंबई - नाशिक महामार्गावर जाण्यासाठी मुंब्र्याहून ठाणे गाठण्याची किंवा कल्याणहून नाशिक महामार्ग न गाठता थेट नाशिक महामार्गावर प्रवेश मिळणार आहे. यामुळे नागरिकांची वाहतूककोंडीतून सुद्धा सुटका होणार आहे. तसेच शिळफाटा परिसरातील वाहतूक कोंडी सुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे.