
मुंबई (Mumbai): मंत्रालय परिसरात बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारतीचे बांधकाम कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या. मंत्रालय परिसरात नवीन सुसज्ज सात मजली इमारतीच्या उभारणी कामाची सुरुवात तातडीने करण्यात यावी, अशा सूचना यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्या होत्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या १५० दिवसाच्या कृती कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत असलेली विविध कामे, उपक्रमांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी आढावा घेतला.
सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, सचिव संजय दशपुते यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भोसले यांनी सांगितले, राज्यातील विकासकामांचा वेग वाढविण्यासाठी १५० दिवसांच्या कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा असून या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाने विहित कालमर्यादेत काम करून विकास कामाबरोबरच प्रशासकीय कामातही विभागाचे वेगळेपण सिद्ध करावे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १५० दिवसाच्या कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेऊन मंत्री भोसले यांनी सांगितले, विभागाचे संकेतस्थळ अद्ययावत करून अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत. यामध्ये सेवा प्रवेश नियम, आकृतीबंध, अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती, सेवाज्येष्ठता आणि पदोन्नतीची प्रक्रिया यावर वेगाने काम करावे.
‘विकसित महाराष्ट्र २०४७’ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून काम करणे गरजेचे आहे. यासाठी व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मुदतीत पूर्ण करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
मंत्री भोसले यांनी मंत्रालय परिसरात बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारत बांधकाम प्रकल्पांचा आढावा बैठकीत घेतला. मंत्रालय नवीन इमारतीचे बांधकाम कालमर्यादेत करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना यावेळी दिल्या.