Pune Rain Tendernama
पुणे

Pune: वाहतूक कोंडी अन् सोसायट्या, वस्त्यांत पाणी; पुण्यात प्रशासनाचे नेमके काय चुकतंय?

PMC: सदाशिव, नारायण, शनिवार पेठेसह शिवाजी रस्ता, शास्त्री रस्ता, टिळक रस्ता आदी भागांतील रस्ते 'जॅम'

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच भागात दाणादाण उडाली आहे. रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. अनेक सोसायट्या, वस्त्यांमध्ये पाणी शिरले. तर चौकाचौकात तळे निर्माण झाले होते.

महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात दिवसभरात पाणी तुंबल्याच्या ९० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. खराब रस्त्यांमुळे पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागली.

शहरात बुधवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. गुरुवारी (ता. १९) दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे कोथरूड, कर्वेनगर, वारजे, बावधन, सूस, नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्ता, औंध, बोपोडी, हडपसर, धानोरी, येरवडा, धायरी, कात्रज, कोंढवा, बाणेर, बालेवाडी भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.

आपत्ती व्यवस्थापन निवारण कक्षाकडे दिवसभरात पाणी साचल्याच्या ९० तक्रारी आल्या. नागरिकांच्या तक्रारी येताच क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील पथकांकडून पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू होते. तसेच, पथ विभाग, मलनिःसारण विभागातील कर्मचारीही रस्त्यावर उतरून काम करत होते. पाणी साठलेल्या रस्त्यावरील चेंबरचे झाकण उघडून पाण्याच्या प्रवाहाला वाट मोकळी करून दिली जात होती. पण हे पाणी तुंबल्यामुळे सकाळी कामाला जाण्यासाठी बाहेर पडलेले नागरिक वाहतूक कोंडीत अडकले होते.

शहरात मुसळधार पाऊस पडल्याने अनेक भागात पाणी घुसल्याच्या तक्रारी आल्या. तेथे लगेच मदत पाठवून २० मिनिटाच्या आत पाण्याचा निचरा करण्यात आला. खडकवासला धरणातून पाणी सोडले जात असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सावध केले आहे. खडकवासलाजवळ सुमारे १५ घरात पाणी घुसल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

- गणेश सोनुने, सहाय्यक आयुक्त, आपत्ती व्यवस्थापन विभाग

गेल्या वर्षी एकतानगरीमध्ये पुराचे पाणी घुसले होते. यंदा खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर अशी स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी एकतानगरीसाठी स्वतंत्र पथक नियुक्त केले आहे. हे पथक येथे तैनात करण्यात आले आहे.

- संदीप खलाटे, उपायुक्त, आपत्ती व्यवस्थापन विभाग

रस्त्यावर पाणी साचल्याने कोंडी

- धायरी नऱ्हे, आंबेगाव, सिंहगड रस्ता, नवले पूल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले, राष्ट्रीय महामार्गावर कोंडी

- बोपोडी येथील भाऊ पाटील रस्त्यावरील चेंबर तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर

- निलायम चित्रपटगृहात झाड पडले, त्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा

- आठवले चौक ते प्रभात रस्ता कॅनॉल रस्त्यावर पाणी तुंबले

- सदाशिव, नारायण, शनिवार पेठेसह शिवाजी रस्ता, शास्त्री रस्ता, टिळक रस्ता आदी भागात पाणी जमा झाल्याने वाहतूक कोंडी