
पुणे (Pune) : राज्य परिवहन विभागाने वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट - HSRP) लावण्यासाठी दिलेल्या मुदतीत तिसऱ्यांदा वाढ केली आहे.
पात्र वाहनांपैकी केवळ ३० टक्के वाहनांना उच्च सुरक्षा पाटी बसविण्यात आली आहे. वाहनधारकांचा अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसल्याने परिवहन विभागाने मुदतवाढ दिली. वाहनधारकांना १५ ऑगस्टपर्यंत दिलेली मुदतवाढ ही शेवटची असून, आता पुन्हा मुदतीत वाढ होणार नसल्याचे परिवहन आयुक्तांनी सांगितले.
वाहनधारकांचा अपुरा प्रतिसाद, ऑनलाइन नोंदणीत येणाऱ्या अडचणी, उशिरा मिळणारे प्लेट आदी विविध कारणांचा परिणाम वाहनाला नंबरप्लेट बसविण्याच्या प्रक्रियेवर होत आहे. पूर्वी ३० मार्चपर्यंत मुदत होती, ती वाढवून ३० एप्रिलपर्यंत केली. त्यांनतर दोन महिन्यांनी मुदत वाढवून ३० जूनपर्यंत करण्यात आली.
आताही दीड महिन्यांची वाढ केली. मात्र, पुण्यासह अन्य शहरात नंबरप्लेट बसविण्याचा वेग लक्षात घेता, याला आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. मात्र, सध्या तरी पुन्हा मुदतवाढीची शक्यता नसल्याचे परिवहन आयुक्तांनी सांगितले.
पुण्यात पात्र वाहनांची संख्या २६ लाख पेक्षा जास्त आहे. आतापर्यंत सुमारे चार लाखांहून अधिक वाहनांना नंबरप्लेट बसविली गेली आहे.
उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसविण्यासाठी दिलेल्या मुदतीत वाढ केली आहे. १५ ऑगस्टची मुदतवाढ ही शेवटची मुदतवाढ असणार आहे. पाटी बसविणाऱ्या वाहनांची संख्या वाढविण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहे.
- विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त, मुंबई